शाळा ऑनलाइन; मात्र १०० टक्के फी वसुली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:23 AM2021-06-21T04:23:35+5:302021-06-21T04:23:35+5:30
कोरोनाचा सर्वाधिक परिणाम शिक्षण व रोजगारावर झाला आहे. मुलांचे भविष्य अंधकारमय होऊ नये यासाठी ऑनलाइन शिक्षण आत्मसात करा, ...
कोरोनाचा सर्वाधिक परिणाम शिक्षण व रोजगारावर झाला आहे. मुलांचे भविष्य अंधकारमय होऊ नये यासाठी ऑनलाइन शिक्षण आत्मसात करा, असे आवाहन सरकार, शिक्षणतज्ज्ञ व खासगी शिक्षण संस्था करीत आहेत. जिल्ह्यातील एक-दोन खासगी संस्थांचा अपवाद वगळून गतवर्षी ऑनलाइन शिक्षण दिल्यानंतर पालकांकडून १०० टक्के फी वसुली करण्यात आली होती. २०२०-२१ मध्ये मुलांना डिजिटल ऑनलाइन शिक्षण देण्याचे पहिले वर्ष होते. त्यामुळे पालकांनी १०० टक्के फी भरली. मात्र, बऱ्याच मुलांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या नाहीत. काही मुले तर होते तिथेच आहेत. ऑनलाइन शिक्षणातील अडचणी वर्ष संपूनही ‘जैसे थे’ होत्या, असे पालकांचे म्हणणे आहे. मुले त्या शाळेत शिकतात, उगाच कशाला वाद, असा गोड समज करून तक्रारीही करीत नाहीत, हेही वास्तव आहे. त्यामुळे यंदाच्या नवीन शैक्षणिक सत्रात १०० टक्के फी भरतीलच याची शाश्वती नाही असे चित्र, तर दुसरीकडे कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी घरच्या घरी दिलेले ऑनलाइन शिक्षण फायदेशीर ठरले. शिक्षकांना वेतन देण्यापासून अन्य शिक्षणपूरक बऱ्याच बाबींसाठी आर्थिक खर्च झाला. ऑनलाइन शिक्षणाचा उत्तम परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर झाला, असा दावा शिक्षण संस्थांकडून केला जात आहे.
बॉक्स
इंग्रजी शाळांनी ब्रिज कोर्स शिकावा
जिल्ह्यातील विनाअनुदानित बऱ्याच इंग्रजी शाळांची ऑनलाइन शिकवणी सुरू झाली. जि. प. शाळा येत्या २८ जूनपासून सुरू होणार आहेत. सरकारी व खासगी शाळेतील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम निश्चित करण्याचे काम सुरू आहे. गतवर्षीपासून शाळा बंद आहेत. विद्यार्थी पाचवीत गेला असेल तर चौथीतील कठीण भाग किमान दोन आठवडे शिकविण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या. त्यामुळे खासगी इंग्रजी शाळांनी थेट पुढच्या वर्गाचे शिकविण्याऐवजी काही दिवस हा ब्रिज कोर्स शिकवावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.