शाळेच्या पूर्वदिनी शैक्षणिक पदयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:41 AM2019-06-24T00:41:43+5:302019-06-24T00:42:15+5:30
२६ जून रोजी विदर्भातील सर्व शाळा सुरु होत आहेत. प्रवेशपात्र बालकांच्या स्वागतासाठी शाळा पूर्व तयारी आणि पूर्वदिनी घरभेटीसाठी २५ जून रोजी शैक्षणिक पदयात्रा काढुन गावागावात जनजागृती करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : २६ जून रोजी विदर्भातील सर्व शाळा सुरु होत आहेत. प्रवेशपात्र बालकांच्या स्वागतासाठी शाळा पूर्व तयारी आणि पूर्वदिनी घरभेटीसाठी २५ जून रोजी शैक्षणिक पदयात्रा काढुन गावागावात जनजागृती करण्यात येणार आहे.
मंगळवार २५ जून रोजी सकाळी ७ वाजता सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह शिक्षकांचे शाळेत आगमन होणार आहे. प्रवेशपात्र बालकांची यादी ग्रामपंचायत व शाळा फलकावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यानंतर ७ ते ७.३० वाजता दरम्यान ध्वनीक्षेपकांवरुन सर्व बालकांना २६ जून रोजी सकाळी ७ वाजता शाळेत पाठविण्याची विनंतीवजा सुचना करण्यात येणार आहे.
प्रवेशपात्र बालकांची यादी ध्वनीक्षेपणावरुन जाहिर करावयाची आहे.
२६ जून ला शाळा सुरु होत असल्याने सकाळी ७ वाजता सर्व बालकांना शाळेत पाठवा अशी विनंती पालकांना करावयाची आहे. नवागतांच्या स्वागतासाठी शालेय परिसर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी २५ ला सकाळी ९ ते १०.३० या वेळात गावातील युवक व बचत गटांच्या सहाय्याने शाळा परिसर स्वच्छ करुन सडा सिंपडणे, रांगोळी काढणे, आंब्याच्या किंवा उपलब्ध असलेल्या पानाफुलांची तोरणे बांधून शाळेचा परिसर सुशोभित करण्यात यावा व ध्वनीवर्धकावर देशभक्तीपर गीत वाजवावे अशा सुचना शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी यांचेमार्फत शाळा मुख्याध्यापकांना दिलेल्या आहेत.
शिक्षकांचा गट देणार गृहभेटी
गाव मोठा असल्यास शिक्षकांचा गट तयार करुन घरभेटी, शैक्षणिक पदयात्रा काढून प्रत्येक प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहचणे अपेक्षीत आहे. शिक्षकांसह सरपचं, गावकरी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, युवक-युवती, बचतगट व ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनी गावातील प्रत्येक घराला भेट देवून प्रवेशपात्र बालकांचे प्रवेश अर्ज भरुन घ्यावेत.