‘टेकू’वर उभी आहे शाळेची भिस्त
By admin | Published: March 27, 2017 12:28 AM2017-03-27T00:28:44+5:302017-03-27T00:29:02+5:30
शैक्षणिक प्रगतीसाठी धडपडणारे शासन अन् प्रशासन. पण, दुसरीकडे ग्रामीण भागातील शाळांच्या इमारती जीवघेण्या आहेत.
अपघाताची शक्यता : इमारतीला तडे, मरणाची वाट बघणार काय?
मोहाडी : शैक्षणिक प्रगतीसाठी धडपडणारे शासन अन् प्रशासन. पण, दुसरीकडे ग्रामीण भागातील शाळांच्या इमारती जीवघेण्या आहेत. कान्हळगाव/ सिरसोली येथील प्राथमिक शाळा 'टेकू'वर उभी आहे. ती कधीही कोसळू शकते. तथापि, शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.
गुणवत्तेसाठी शिक्षण खाते विविध प्रयोग करीत आहे. त्यामुळे शिक्षक गुणवत्तेच्या दावणीला बांधली गेली आहेत. शिक्षणाचा दर्जा कदाचित उधारेलही, पण ज्या शाळेत विद्यार्थी सुरक्षित आहेत काय, असा सवाल निर्माण व्हायला जागा आहे. जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारती विद्यार्थ्यांच्या मृत्यूची वाट तर बघत नाही ना? १९३४ या साली कान्हळगाव/ सिरसोली येथे जिल्हा परिषदेची शाळा उभी केली गेली. पंधरा वर्षापूर्वी त्या शाळेची उंची कमी करण्यात आली. एवढीच दुरुस्ती जिल्हा परिषद कान्हळगावच्या शाळेची करण्यात आली. इमारतीची उंची कमी झाली पण, समस्या आजही कायम आहे. ८३ वर्षापुर्वी तयार झालेली कान्हळगाव शाळेची इमारत धोकादायक स्थितीत आहे. याबाबद शाळेच्या शिक्षण समितीने शिक्षण विभागाला वारंवार कळविले. मात्र शिक्षण विभागाने गंभीर बाबीची आजपर्यंत दखल घेतली नाही. जिल्हा परिषद शाळा कान्हळगावच्या शाळेचा कौलरु छत लोखंडी खांबाच्या 'टेकू'वर उभा आहे. लाकडी फाटे जिर्ण होवू तुटली, वाकली आहेत. छतावरील कवेलू तुटलेल्या आहेत. काही भागात कवेलू नसल्याने प्लॉस्टीक टाकण्यात आली आहे. इमारतीला भेगा पडलेल्या आहेत. जागोजागी इमारतीला तडे गेले असल्याने मोठ्या धोक्याची सुचना देत आहे. इमारतीत असलेल्या कुबड्या विद्यार्थ्यांच्या असुरक्षिततेला मारक ठरल्या आहेत.
अगदी वरच्या भागावर 'यम' प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या मृत्यूची प्रतिक्षा करीत असल्याची चिन्हे आहेत. सुरक्षिततेची हमी स्विकारणारे शिक्षण विभाग टाळाटाळ का करीत आहे. असा सवाल आहे. (तालुका प्रतिनिधी)
शाळेच्या दुरुस्तीबाबत ठराव दिले गेले. मंजूरी मिळूनही कामात अडथळा आणला. विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी पडवीस बसावावे लागते.
- गणेश ठवकर
अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती
तीन दिवसापुर्वी पून्हा शाळेची इमारत धोकादायक असल्याबाबद अधिकाऱ्यांना लेखी कळविले आहे.
- जगदिश निमजे, मुख्याध्यापक