स्थायी शिक्षक न मिळाल्यास १ जुलैपासून आंदोलन करण्याचा पालकांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 01:40 PM2024-06-29T13:40:42+5:302024-06-29T13:42:02+5:30
निवेदन : टवेपार येथील शाळा समिती व पालकांचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरालगतच्या टवेपार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गत वर्षभरापासून स्थायी शिक्षक नाही. शैक्षणिक सत्राला सुरुवात होत असतानाही जिल्हा परिषद शिक्षण विभाग याप्रकरणी गंभीर नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेत स्थायी शिक्षकाच्या मागणीसाठी टवेपार येथील शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामपंचायत पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. शिक्षण विभागाच्या बेपर्वाईविरोधात १ जुलैपासून शाळाबंद आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी यांना तक्रार निवेदनातून दिला आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टवेपार येथे एका शिक्षकाची स्थायी नियुक्ती करण्याबाबत ३ एप्रिल २०२३, २३ मे २०२३, ६ जून २०२३ व ४ मार्च २०२४ जिल्हा परिषद शिक्षण विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला होता. परंतु, अद्यापही शिक्षण विभागाकडून स्थायी शिक्षकाची नियुक्ती झालेली नाही. यापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने २७ जून २०२३ आणि ४ मे २०२४ रोजी पत्र देऊन शाळाबंद आंदोलन करण्यात आले होते.
त्यानंतर शिक्षण विभागाच्यावतीने टवेपार शाळेत स्थायी नियुक्ती देण्यासंदर्भात जुन्या प्रभारी शिक्षकास शैक्षणिक कार्य करण्याकरिता आदेश दिलेले असल्याचे पत्राद्वारे कळविले गेले. त्यामुळे शाळा समिती, पालक व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी शाळाबंद आंदोलन मागे घेत प्रशासनाला सहकार्य केले होते. परंतु, सत्र २०२४- २५ ला सुरुवात झालेली आहे. मात्र, अद्यापही एका सहायक शिक्षकांची स्थायी नियुक्ती मिळालेली नाही. त्यामुळे शाळा समिती व पालकांत नाराजीचा सूर आहे.
मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीता लुटे, उपाध्यक्ष शरद कडव, सदस्य भारती लुटे, गोपाल सेलोकर, सरपंच रिना गजभिये, प्रभू मते, रामसागर कातोरे, श्रीकांत मते, राजेश तिजारे, माया मेश्राम आदी पदाधिकारी व पालक उपस्थित होते.
प्रवेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी राहणार शुकशुकाट
टवेपार येथील शून्य पटसंख्येची शाळा ग्रामस्थांनी नव्या दमाने सुरू केली. आज पटसंख्या वाढली असताना शिक्षण विभाग शाळेत स्थायी शिक्षक देण्यास उत्सुक नाहीत, ही गंभीर बाब आहे. त्यामुळे स्थायी शिक्षक मिळेपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्धार पालकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी शाळेत शुकशुकाट राहण्याची शक्यता आहे.