शिक्षकांअभावी ओस पडल्या शाळा
By admin | Published: June 29, 2016 12:36 AM2016-06-29T00:36:02+5:302016-06-29T00:36:02+5:30
बदल्या करताना संबंधीत शाळेत किती शिक्षक शिल्लक राहतील याचा विचार करण्यात आलेला नाही.
प्रकरण शिक्षक बदलीचे : शिक्षकांमध्ये अजूनही रूजू होण्याबाबत संभ्रमावस्था
अशोक पारधी पवनी
बदल्या करताना संबंधीत शाळेत किती शिक्षक शिल्लक राहतील याचा विचार करण्यात आलेला नाही. बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याने कित्येक शाळा शिक्षकांशिवाय सुरू झाल्या. तर काही शाळा सात वर्ग असूनही दोन शिक्षकांवर सुरू झालेल्या आहेत.
ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे शासन निर्णयानुसार सार्वजनिक बदल्या २०१६ संबंधाने समुपदेशन कार्याशाळा येण्यात आली. शासन निर्णयानुसार प्राथमिक शिक्षकांच्या प्रकासकीय विनंती नुसार बदल्या करण्यात आल्या.
तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धानोरी व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कन्हाळगाव या दोन्ही शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत. परंतु दोन्ही शाळेत प्रत्येकी दोन शिक्षक शिल्लक आहेत. जोड वर्गाची पद्धत फार जूनी आहे. नव्या पद्धतीने दोन्ही शिक्षकांने तीन तीन वर्ग एकत्र बसविले तरीही एक वर्ग शिल्लक राहतो. म्हणून शासनाचे धोरणानव्ये हा प्रकार म्हणजेच बहुवर्ग अध्यापन पद्धती आहे, असे पालकांनी समजावे काय, असा प्रश्न उद्भवलेला आहे.
पवनी नगरपालिका क्षेत्रात एकमेव असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पहिल्याच दिवशी शिक्षकांशिवाय उघडण्यात आली. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इसापूर ही सुद्धा शिक्षकाशिवाय उघडण्यात आली. दोन्ही शाळेमधून प्रत्येकी दोन्ही शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. दोन्ही शाळेत उन्हाळ्याच्या सुटीत शिक्षक रूजू झाले. परंतू शाळेच्या पहिल्याच दिवशी ते शाळेत हजर झाले नाही. पवनी येथील केंद्र प्रमुख जी.एल. गायधने व आसगावचे केंद्रप्रमुख के.डी. भुरे यांनी स्वत: शाळेत उपस्थित राहून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून प्रथम दिवस साजरा केला.
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याचे प्रकरण सुरूवातीला मंत्रालयापर्यंत व नंतर न्यायालयापर्यंत पोहचले. त्यामुळे जिल्हाभर अशी अवस्था निर्माण झालेली आहे. शिक्षण क्षेत्रात असा धोळ करणारांनी विद्यार्थ्यांच्या हिताकडे लक्ष देवून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ही संकल्पना पुर्णत्वास न्यावे, अशी मागणी होवू लागली आहे.