भटक्यांनी उभारली भटक्यांसाठी शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2017 12:26 AM2017-03-18T00:26:19+5:302017-03-18T00:26:19+5:30
देश प्रगतीकडे झेपावत असल्याच्या बाता होत असल्या तरी भटक्या विमुक्तांचे जगणे अजूनही उपेक्षित आहे.
सेवाभावनेतून घेतला ज्ञानदानाचा वसा : पहिल्याच प्रयत्नात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भंडारा : देश प्रगतीकडे झेपावत असल्याच्या बाता होत असल्या तरी भटक्या विमुक्तांचे जगणे अजूनही उपेक्षित आहे. पोटापाण्याचा प्रश्न बिकट असताना शिक्षण घेणे मैलोगणिक दूर आहे. त्यांना शिकवून शहाणे करुन सोडण्याच्या उमेदीने भटक्या समाजातील सुशिक्षितांनी आपल्या भावंडांसाठी पालावर शाळा सुरू केली आहे.
शिवजयंतीचा मुहूर्त साधून या शाळांना प्रारंभ करण्यात आला. भंडाऱ्यात झालेल्या बिऱ्हाड परिषदेतून मिळालेल्या ऊर्जेतून त्यांनी समाजबांधवांना अज्ञानाच्या गर्तेतून शिक्षणाची वाट दाखविण्याचा प्रण केला. भंडारा जिल्ह्यातील चोरखमारी, गिरोला, कारधा, भिलेवाडा, वडद, कोदामेडी व गोंदिया जिल्ह्यातील मुंडीकोटा, कुडवा येथे या शाळांचा शुभारंभ केला आहे. भिलेवाडा येथे राहुल चौहान, निशा गोविंद मखरे, विकेश अंकोश तांदूळकर, विनोद बांते यांच्या उपस्थितीत उदघाटन झाले. गिरोला येथे निशिकांत लेंडे, उपसरपंच दुर्गा शेंडे, ग्रामपंचायत सदस्य अमोल साकुरे, भीमराव ठाकरे, प्रशांत खोब्रागडे उपस्थित होते. कारधा येथे पंचायत समिती सभापती प्रल्हाद भुरे, निलेश मोरेश्वर शेंडे, आनंद खडसे, प्रशांत खोब्रागाडे, विनोद बांते, रामेश्वर, भोवते, प्रभू पाथरे, शंकर दोनोडे, ज्ञानेश्वर सोनवणे, शिवा कांबळे, प्रा. राजेंद्र दोनाडकर उपस्थित होते. कोदामेडी, ता. लाखांदूर येथे दिलीप चित्रीवेकर, लक्ष्मन जांगळे, बळीराम लांडगे, बाजीराव चव्हाण, कार्तिक मोहनलाल वडस्कर, भारत लाल वडस्कर, रोहित शिंद उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी व्हावा, यासाठी गोविंद केवल मखरे, रुपेश भानारकर, शंकर सार्वे, सुरभी चित्रीवेकर प्रयत्नरत आहेत. (नगर प्रतिनिधी)
भिक्षेतून देणार मानधन
सरकारच्या योजनांचा प्रकाश भटक्या व वंचितांच्या घरात पडलेला नाही. शिक्षकांची यंत्रणाही त्यांना ज्ञानाची गुरुकिल्ली देण्यात कमी पडली. अशा स्थितीत आपल्या लोकांना आपणच शिकविले पाहिजे, या भावनेतून भटक्या समाजातील शिक्षित तरुण पुढे आले आहेत. त्यांना मोबदल्याची अपेक्षा नाही. तरीही त्यांना मासिक ८०० रुपये मानधन दिले जाईल. हे मानधन भिक्षा मागून गोळा केलेल्या पैशातून देण्यात येणार आहे.
कार्यकर्त्यांची धडपड
समाजाला समोर न्यायचे आहे, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. यासाठी केवळ शासकीय मदतीवर विसंबून राहून चालणार नाही. फक्त मेळावे अन् परिषदा घेऊन आपल्या समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत. ही बाब काही धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांनी जाणली. आम्हीच आमच्या समाजाचे भवितव्य घडविणार, या उमेदीने ७० कार्यकर्ते एकत्र येऊन आपल्या जिवाचे रान करीत आहेत.