विज्ञाननिष्ठा, चिंतनशीलता हाच संशोधनाचा पाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 11:07 PM2018-03-28T23:07:47+5:302018-03-28T23:07:47+5:30
विज्ञान शिक्षकांना आजच्या शिक्षण पद्धतीतून समाज व राष्ट्राच्या कल्याणाकरिता खूप काही साध्य करता येणार नाही. परंतु विज्ञानातील विविध संदर्भ व अनुमान समजून त्यादिशेने विचारपूर्वक व चिंतनशिलतेने नवनवे प्रयोग करून संशोधन क्षेत्रात खरी प्रगती साधता येते, म्हणून सर्वांनी विज्ञान शिकताना प्रत्येक गोष्टींवर गंभीरपणे विचार करून अभ्यासपूर्ण तयारीने जीवनाची वाटचाल करावी, ....
आॅनलाईन लोकमत
साकोली : विज्ञान शिक्षकांना आजच्या शिक्षण पद्धतीतून समाज व राष्ट्राच्या कल्याणाकरिता खूप काही साध्य करता येणार नाही. परंतु विज्ञानातील विविध संदर्भ व अनुमान समजून त्यादिशेने विचारपूर्वक व चिंतनशिलतेने नवनवे प्रयोग करून संशोधन क्षेत्रात खरी प्रगती साधता येते, म्हणून सर्वांनी विज्ञान शिकताना प्रत्येक गोष्टींवर गंभीरपणे विचार करून अभ्यासपूर्ण तयारीने जीवनाची वाटचाल करावी, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपुरचे किरणोत्सरीय सुरक्षा अधिकारी व भाभा अनुसंधान केंद्र मुंबईचे माजी वैज्ञानिक डॉ.सुदर्शन जावळकर यांनी केले.
स्थानिक मनोहरभाई पटेल महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतर्फे विज्ञान मंडळाचा समारोप व बक्षिस वितरण समारंभ पार पडला.त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिश त्रिवेदी उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नवेगावबांध - नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे सहाय्यक वनसंरक्षक आर.आर. सदगीर उपस्थित होते. डॉ.सुदर्शन जावळकर म्हणाले विज्ञान शिक्षणाचे 'ग्लोबलायजेस' झाल्यामुळे आपल्या पुढील असलेली शिक्षण क्षेत्रातील आव्हाने फार मोठी जरी असली तरी वेळेचे नियोजन, कठोर परिश्रम आवश्यक आहे.
प्रास्ताविक विज्ञान मंडळाचे प्रभारी डॉ.एल.पी. नागपुरकर यांनी केले. त्यांनी विज्ञान मंडळाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सहभागातून आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे स्वरुप व त्यांच्या आयोजनामागची भूमिका व फायदे यांचा आढावा दिला.
आर.आर. सदगीर यांनी म्हणाले, केवळ वैज्ञानिकच समाज व राष्ट्र कल्याणाकरिता व प्रगतीकरिता आपल्या संशोधनातून योगदान देवू शकतो, विज्ञानशिवाय हे अशक्य आहे म्हणून विद्यार्थ्यांनी संशोधनवृत्ती अधिक बळकट करून व विज्ञान मंडळाच्या अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमामध्ये सहभागी होवून चिंतनशिलता व आत्मविश्वास वाढवावा. या देशाला प्रगतीकडे वाटचाल करण्यास मदत करावी असे प्रतिपादन केले.
डॉ.सुदर्शन जावळकर यांनी आपल्या 'अॅट्म्स इन मोशन' या विषयावर आपल्या विशेष व्याख्यानातून भौतिक शास्त्राचे नवे नवे संदर्भ देवून विविध पैलू उलगडून भौतिकशास्त्राचे मानव कल्याणाकरिता असलेले योगदान स्पष्ट केले. विज्ञाननिष्ठा व कर्मनिष्ठा संशोधन कार्यात किती महत्वाची असते याची अनेक उदाहरणे दिली.
बक्षिस वितरण समारंभात विद्यार्थ्यांना पोस्टर स्पर्धेची १० बक्षिसे, प्रश्नमंजुषा स्पर्धेची ८ बक्षिसे, सेमीनार स्पर्धेची १२ व वादविवाद स्पर्धेची ४ बक्षिसे पाहुण्यांच्या हस्ते वितरीत करून गौरव करण्यात आला.
विशेष म्हणजे पदवी परीक्षेच्या त्रिवर्षी अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व इतर क्षेत्रातील प्राविण्यपूर्ण योगदानाबद्दल विज्ञान शाखेतील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून विकास बावनकुळे, महेश लंजे, पार्थवी रानपरीया, दिव्या नाकाडे, योगेश भेंडारकर या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
पाहुण्यांचा परिचय प्रा.राजीव मेश्राम यांनी केला. संचालन शिवाजी रानपरीया व नंदिनी चिंचखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन विज्ञान मंडळाचे सचिव पार्थवी रानपरिया हिने केला. कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.