लिपिकाच्या मोबाईलवर प्रश्नांच्या उत्तरांचा ‘स्क्रीनशॉट’; तीन आरोपी अटकेत, एक फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 11:16 AM2023-06-08T11:16:53+5:302023-06-08T11:17:11+5:30
कोतवाल भरती : प्रश्नांची उत्तरे मोबाईलद्वारे इतर उमेदवारांना सांगून परीक्षेत फसवणूक करण्यास प्रवृत्त केले
भंडारा : भंडारा तहसीलमध्ये कोतवाल भरती परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा स्क्रीनशॉट सर्वप्रथम जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिकाच्या मोबाईलवर आल्यानंतर तहसीलदारांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चारजणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यात तीन आरोपींना अटक केली असून, त्यापैकी एक फरार आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये परीक्षार्थी चेतन बावनकुळे (वय१९), चेतनचा चुलत भाऊ राहुल बावनकुळे आणि अरविंद सुनील घरडे (सर्व रा. परसोडी) यांचा समावेश आहे. अरविंद धरणगाव (रा. बेला) हा फरार असल्याचे सांगण्यात आले.
माहितीनुसार, भंडारा तहसीलमधील कोतवाल पदाच्या भरती प्रक्रियेअंतर्गत २८ मे रोजी लाल बहादूर शास्त्री शाळा केंद्रावर सकाळी ११ ते १२ या वेळेत लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षा सुरू झाल्याच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे लिपिक निमेश गेडाम यांच्या मोबाइलवर प्रश्नांच्या उत्तरांचा स्क्रीनशॉट प्राप्त झाला, त्यानंतर भंडाराचे तहसीलदार अरविंद हिंगे यांनी गोपनीय पद्धतीने या प्रकरणाचा तपास सुरू केला.
तपासादरम्यान, चार आरोपींनी आपल्या साथीदारांच्या मदतीने नियोजन करून परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मोबाईलद्वारे इतर उमेदवारांना सांगून परीक्षेत फसवणूक करण्यास प्रवृत्त केल्याचे समोर आले. सरकारी नोकरी मिळविण्यासाठी शासनाची फसवणूक केल्याची लेखी तक्रार तहसीलदार हिंगे यांनी भंडारा पोलिस ठाण्यात दाखल केली, त्यानुसार पोलिसांनी चारजणांविरुद्ध कलम ४२०, १२० (ब) आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. आयपीसी आणि कॉपी प्रतिबंध कायद्याचे कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील करूत आहेत.