लेडी सिंघम आल्या रे.. आल्या.. एसडीओंची धडक कारवाई, रेती तस्करांची पळापळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2022 03:19 PM2022-06-14T15:19:32+5:302022-06-14T15:26:30+5:30
तुमसर व मोहाडी तालुक्यात रेती तस्करांनी कारवाईपुढे अक्षरशः नांगी टाकलेली दिसते. धडक कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले.
मोहन भोयर
तुमसर (भंडारा) : काही दिवसांपूर्वी शहर व ग्रामीण भागात सहज मिळणारी रेती आता मिळेनाशी झाली आहे. नव्याने रूजू झालेल्या आयएएस महिला उपविभागीय अधिकारी कोणत्याही वेळी रेतीघाटावर धडकतात. त्यामुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे. रेती तस्करांची त्यामुळे धावपळ सुरू असून ‘लेडीज सिंघम आल्या रे आल्या’ असे म्हणून धूम ठोकतात.
तुमसर तालुक्यात बावानथाडी व वैनगंगा नदी आहे. येथील नदीपात्रात गुणवत्तापूर्ण रेती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे रेती व्यवसाय येथे फोफावला आहे. रेतीघाटांचा लिलाव न झाल्यामुळे रेती तस्करांचे फावत आहे. महसूल प्रशासनाचा कोणताच धाक येथे नव्हता. त्यामुळे रेती तस्करांच्या येथे टोळ्या निर्माण झाल्या आहेत. रेती व्यवसायातून कोट्यावधी कमावले असून काहींनी आता राजकारणातही प्रवेश केला. कारवाईची कोणतीच भीती या रेती तस्करांना नाही.
मात्र दोन महिन्यांपूर्वी तुमसर येथे आयएएस असलेल्या उपविभागीय अधिकारी बी. वैष्णवी रूजू झाल्या. त्यांनी सुरुवातीपासूनच रेती चोरी करणाऱ्या विरुद्ध धडक कारवाई सुरू केली. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहे. तुमसर व मोहाडी तालुक्यात रेती तस्करांनी कारवाईपुढे अक्षरशः नांगी टाकलेली दिसते. धडक कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले.
रेतीचे भाव वधारले
धडक कारवाईमुळे रेती तस्करी बंद झाली. त्याचा परिणाम रेतीचे भाव वधारण्यात झाले आहे. तुमसर शहरात एक ट्रॅक्टर रेतीची किंमत ३५००, तर ग्रामीण भागात २००० ते २५०० रुपयांपर्यंत गेली आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. कितीही पैसे घ्या परंतु रेती द्या, अशी सध्या स्थिती झाली आहे. एक ते दीड महिन्यात सुमारे ४० ते ५० लाख रुपयांचा दंड उपविभागीय अधिकाऱ्यांनी रेती तस्करांकडून वसूल केल्याचे समजते.
सुकडी व रोहा घाटावरून रेती चोरी
तुमसर तालुक्यातील शेवटचे टोक असलेले सुकडी (दे.) व त्याच्या शेजारी असलेल्या मोहाडी तालुक्यातील रोहा येथील रेती घाटातून रेती चोरी सुरू आहे. याकडे उपविभागीय अधिकारी बी. वैष्णवी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.