सातोनात राशन दुकान केले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 05:00 AM2020-04-12T05:00:00+5:302020-04-12T05:01:04+5:30
संचारबंदीने लोकांच्या हाताला काम नाही, अशा परिस्थितीत प्रत्येकच कुटुंब मोठ्या अडचणीत जीवन जगत आहेत. त्यांना पोट भरण्यासाठी शासनाच्या राशन दुकानाचा मोठा आधार आहे. परंतु काही राशन दुकानदार अशा परिस्थितीत नफाखोरी करण्यास मागे पुढे पाहत नाही. एकीकडे काही दानशूर व्यक्ती गरिबांना मदत करीत आहेत, तर दुसरीकडे काही दुकानदार काळाबाजार करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : सध्याच्या परिस्थितीत जनतेला अन्नधान्याची अत्यंत आवश्यकता असताना अधीक नफा कमविण्याच्या उद्देशातून सातोना येथील संताजी मजूर कामगार संस्थेच्या राशन दुकानातून खाण्यास अयोग्य सडलेला गहू वितरित करून कार्डधारकांची थट्टा उडवली जात होती. या राशन दुकानावर पुरवठा विभागाने कारवाई करून दुकान सील केली आहे.
संचारबंदीने लोकांच्या हाताला काम नाही, अशा परिस्थितीत प्रत्येकच कुटुंब मोठ्या अडचणीत जीवन जगत आहेत. त्यांना पोट भरण्यासाठी शासनाच्या राशन दुकानाचा मोठा आधार आहे. परंतु काही राशन दुकानदार अशा परिस्थितीत नफाखोरी करण्यास मागे पुढे पाहत नाही. एकीकडे काही दानशूर व्यक्ती गरिबांना मदत करीत आहेत, तर दुसरीकडे काही दुकानदार काळाबाजार करीत आहेत. सातोना येथे संताजी मजूर कामगार संस्थेचे राशन दुकान असून ज्योतिष बडवाईक हे दुकान चालवितात. या महिन्याचे राशन वितरित करताना त्यांनी शासनाकडून मिळालेला उत्कृष्ट प्रतीचा गहू स्वत:करिता बाजूला ठेवून, स्वत:च्या शेतातील पावसाने सडलेल्या गव्हाचे वितरण कार्डधारकांना करणे सुरू केले. इतर गावातील राशन दुकानातून उत्कृष्ट प्रतीचा गहू मिळत असल्याने लोकांना संशय आला. याची तक्रार अन्न पुरवठा विभागाकडे करण्यात आली. ग्राम दक्षता समिती अध्यक्ष आणि कार्डधारकांच्या उपस्थितीत पुरवठा विभागाने राशन दुकानाची चौकशी केली असता स्वत:च्या शेतातील गहू वितरित करीत असल्याची बाब उघड झाली. तसेच शिल्लक साठ्यापैकी ३१.४५ क्विंटल गहूचा साठा अतिरिक्त आढळला, मग एवढे गहू आले कुठून, तर शिल्लक साठ्यापैकी ७.१९ क्विंटल तांदूळ कमी आढळून आला. तर तांदूळ गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित होतो. शिल्लक गव्हाच्या साठ्यात १५ क्विंटल गहू सडलेल्या स्थितीत निकृष्ट दर्जाचे आढळले. चौकशीत साठा व विक्री रजिस्टर, साठा फलक, दक्षता समिती फलक, तक्रार नोंद वही, आणि बिल पावती पुस्तक आढळून आले नाही. त्यामुळे सदर दुकान सील करण्यात आले असून उपरोक्त दुकान निलंबित करण्याची शिफारस जिल्हा पुरवठा अधिकारी भंडारा यांचेकडे करण्यात आली आहे.
कारवाईत अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग
सातोना येथे करण्यात आलेल्या कारवाईप्रसंगी नायब तहसीलदार घनश्याम सोनकुसरे, पुरवठा निरीक्षक सागर बावरे यांनी कार्डधारक देवेंद्र तायवाडे, मंदा चाफले, श्रीधर हटवार, पंचफुला डोहरे, खेमचंद खोब्रागडे, प्यारेलाल गजभिये, सूर्यकिरण रंगारी, दामोदर कुंडलकर, श्रावण हटवार आदी उपस्थित होते.