वाघाच्या शिकारीवर शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2022 05:00 AM2022-04-03T05:00:00+5:302022-04-03T05:00:44+5:30
लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील बपेरा-अंबागड गाव शिवारातील बावनथडी वितरिकेत ३१ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या असलेल्या नर वाघाचा मृतदेह आढळला होता. १ एप्रिल रोजी शवविच्छेदन झाल्यानंतर या वाघाची शिकार झाल्याचे वक्तव्य वैद्यकीय तज्ज्ञांनी केले होते. मात्र वनविभाग प्रशासन यावर पडदा घालत असल्याचे दिसून येत होते. अखेर सखोल चौकशीअंती या वाघाची शिकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : बावनथडीच्या वितरिकेत आढळलेल्या रुबाबदार नर वाघाच्या शिकारीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. याप्रकरणी वनविभाग व पोलिसांच्या चमूने पाच जणांना ताब्यात घेतले आहे. उल्लेखनीय म्हणजे तपासाअंती ताब्यात घेतलेल्या इसमांकडून रानडुकराची कवटी, रक्ताचे डाग असलेली बैलगाडी व अन्य साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
माहितीनुसार, लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील बपेरा-अंबागड गाव शिवारातील बावनथडी वितरिकेत ३१ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या असलेल्या नर वाघाचा मृतदेह आढळला होता. १ एप्रिल रोजी शवविच्छेदन झाल्यानंतर या वाघाची शिकार झाल्याचे वक्तव्य वैद्यकीय तज्ज्ञांनी केले होते. मात्र वनविभाग प्रशासन यावर पडदा घालत असल्याचे दिसून येत होते. अखेर सखोल चौकशीअंती या वाघाची शिकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवार दुपारपर्यंत एकूण पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.
शेत शिवारात हिंस्र प्राण्यांचा शिरकाव होऊ नये म्हणून शेताच्या सीमेवर वीज तारांचे कुंपण लावण्यात येत असते. त्यात अलगदपणे प्राणी अडकून मृत्युमुखी पडतात. पट्टेदार वाघाचाही मृत्यू झाला असावा असा कयास व्यक्त करण्यात आला. मात्र शवविच्छेदनात वाघाच्या मागील दोन्ही पायांची नखे व दाताचा एक सुळा नसल्याचे उघड झाले होते. शिकारीनंतर बैलगाडीच्या साहाय्याने वाघाचा मृतदेह वितरिकेत नेऊन फेकण्यात आला. ताब्यातील व्यक्तीकडून काही वन्यप्राण्यांचे हाडे, रक्ताचे डाग असलेली बैलगाडी, करंट लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खुंट्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. शनिवारी सकाळीच भंडारा पोलीस विभागाच्या डॉग स्क्वाडला पाचारण करण्यात आले होते. मृत वाघाच्या ओळखीची नोंद वन विभागाच्या रेकॉर्डवर नाही. शवविच्छेदनानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या अनुभवावरून वाघाची शिकार केल्याचे स्पष्ट सांगितले होते. वन विभागाने बैलगाडीतील दांड्यावरील रक्ताचे नमुने चौकशीकरिता पाठवल्याची माहिती आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांचा अन्य प्रकरणाशी संबंध आहे काय? याचाही तपास घेत आहे. तपासात सहायक वनसंरक्षक साकेत शेंडे, आंधळगावचे पाेलीस निरीक्षक मट्टामी, श्वान पथकाचे सतीश सिरीया आंदीचे सहकार्य लाभले.
शेतात आढळले वाघाच्या पायांचे ठसे
- वन विभागाने ज्यांना ताब्यात घेतले, त्यांच्या मालकीच्या असलेल्या उसाच्या शेतात वाघाच्या पायांचे ठसे आढळून आले आहेत. जिथे वाघ मृतावस्थेत आढळला तिथून एक किलोमीटर अंतरावर हे उसाचे शेत आहे. पायाचे ठसे नष्ट करण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
बावनथडी वितरीकेत पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला होता. या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेऊन विचारपूस केली जात आहे. तपास सुरू असल्याने सध्यातरी त्यांची नावे उघड केली जाऊ शकत नाही.
- राहुल गवई, उपवनसंरक्षक, वनविभाग, भंडारा.