भंडारा जिल्ह्यात दुर्मिळ धातूसाठी शोधमोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:46 AM2018-12-13T00:46:49+5:302018-12-13T13:09:37+5:30

ग्रीन एनर्जीसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या रेअर अर्थ मेटलचा साठा (दुर्मिळ धातू) तुमसर तालुक्यात आढळण्याची शक्यता असून त्यासाठी भारतीय भूवैज्ञानिकांकडून तुमसर तालुक्यात सर्वेक्षण करण्यात आले.

Search for rare metal in Tumsar taluka | भंडारा जिल्ह्यात दुर्मिळ धातूसाठी शोधमोहिम

भंडारा जिल्ह्यात दुर्मिळ धातूसाठी शोधमोहिम

Next
ठळक मुद्देभूवैज्ञानिकांकडून सर्वेक्षण : खैरलांजी परिसरात केले उत्खनन

मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : ग्रीन एनर्जीसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या रेअर अर्थ मेटलचा साठा (दुर्मिळ धातू) तुमसर तालुक्यात आढळण्याची शक्यता असून त्यासाठी भारतीय भूवैज्ञानिकांकडून तुमसर तालुक्यात सर्वेक्षण करण्यात आले. खैरलांजी परिसरात दगड फोडून भूगर्भात बोरवेल खोदून त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
तुमसर तालुका हा मॅग्नीज खाणीसाठी संपूर्ण देशात प्रसिध्द आहे. आता या तालुक्यात रेअर अर्थ मेटल असण्याची शक्यता आहे. त्यासाठी गत पंधरवाड्यात भारतीय भूवैज्ञानिक या परिसरात येवून गेले. या पथकाने तुमसर तालुक्यातील सिहोरा राज्य मार्गावरील खैरलांजी शिवारात नाल्या शेजारी दगड फोडून भूगर्भात खोल बोरवेल खोदले. यासाठी अत्याधूनिक यंत्रांचा वापर करण्यात आला. सुमारे एक आठवडा हे पथक येथे तळ ठोकून होते. उर्वरित तुमसर तालुक्यातील इतर ठिकाणीही या पथकाने तपासणी केली. नागपूर येथील वरिष्ठ भूवैज्ञानिक तथा काही अधिकाऱ्यांनी येथे भेटी दिल्या. येथील नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्याच्या अहवालानंतर रेअर अर्थ मेटलचे अस्तित्व उजेडात येणार आहे.
रेअर अर्थ मेटलचा शोध दगडात घेतला जात आहे. ग्रेनाईड, कॉर्बोनाईट व सेग्मेटाईटमध्ये याचा शोध घेतला जात आहे. खैरलांजी येथे अशाप्रकारचे मोठे दगड नाल्याशेजारी आहेत. दगडाला बोर करुन भूगर्भात खोल खड्डा तयार करण्यात आला आहे. याठिकाणी रेअर अर्थ मेटल आढळल्यास तुमसर पुन्हा जागतिक नकाशावर येणार आहे.
रेअर मेटल करावे लागते चीनकडून आयात
ग्रीन एनर्जीला देशात मोठ मागणी आहे. यासाठी रेअर अर्थ मेटल अतिशय उपयुक्त आहे. तुमसर तालुक्यात रेअर मेटर असल्याने त्याचा शोध घेतला जात आहे. आशीया खंडात रेअर अर्थ मेटल चीनमध्ये सर्वाधीक आढळते. सध्या भारत चीनकडून त्याची आयात करीत आहे. या रेअर मेटलचा उपयोग बॅटरी, मोबाईल चिप, मेमरी कार्ड, पेनड्राईव्ह यासह अन्य इलेक्ट्रानिक उत्पादनात केला जातो. तुमसर सोबतच मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्येही रेअर अर्थ मेटलचा शोध घेतला जात आहे.
जिल्हा खनीकर्म विभाग अनभिज्ञ
तुमसर तालुक्यातील खैरलांजी शिवारात आठवडाभर मोठ्या मशीनच्या सहायाने शोध मोहीम राबविण्यात आली. पंरतु जिल्हा खनिकर्ज विभागाला याचा थांगपत्ताही नाही. जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांच्याशी संपर्क साधला असता. त्यांनी याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे तालुक्यात एखादी शोध मोहीम राबविली जाते. तेव्हा महसुल प्रशासन व संबंधित विभागाला त्याची माहिती असते. भारतीय भूवैज्ञानिकांचे पथक तुमसर तालुक्यात आठवडाभर असतांना खनिकर्म विभागाने साधी चौकशीही केली नाही. महसुल प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केले. आम्हाला कोणतीच माहिती नाही. असे सांगून खनिकर्म विभाग आणि खनिकर्म विभाग हातवर करीत आहेत.

Web Title: Search for rare metal in Tumsar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार