अभयारण्यात श्वानपथकाच्या सहाय्याने शोधमोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 10:39 PM2019-01-01T22:39:08+5:302019-01-01T22:39:29+5:30
अशोक पारधी। लोकमत न्यूज नेटवर्क पवनी : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात दोन वाघांचे मृतदेह आढळून आलेल्या नागाच्या बोडीत श्वान पथकाच्या सहाय्याने ...
अशोक पारधी।
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात दोन वाघांचे मृतदेह आढळून आलेल्या नागाच्या बोडीत श्वान पथकाच्या सहाय्याने वन्यजीव विभागाने शोधमोहीम सुरु केली आहे. वाघांनी खाल्लेल्या रानडुकरांवर कुणी विषप्रयोग केला याचा शोध घेतला जात आहे. तुर्तास वन्यजीव विभागाच्या हाती काहीही लागले नाही. मात्र दोन वाघांच्या मृत्यूने पर्यटकांत हळहळ व्यक्त होत आहे.
पवनी तालुक्याच्या चिचगाव कंपार्टमेंट क्रमांक २२६ मध्ये चार्जर आणि राही या दोन वाघांचे मृतदेह आढळून आले होते. ८०० मीटर अंतरात दोन्ही वाघांचे मृतदेह दिसून आले. विशेष म्हणजे रविवारी चार्जर या नर वाघाचा मृतदेह तर सोमवारी राही या वाघीणीचा मृतदेह आढळला होता. मात्र राहीचा मृत्यू चार्जरच्या पूर्वी २४ तास आधी झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून पुढे आले आहे. तसेच या दोन्ही वाघांनी खाल्लेल्या रानडुकरावर विषप्रयोग झाला होता. तेही शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले. या दोन्ही वाघांच्या पोटात रानडुकरांचे मांस व केस आढळून आले. तसेच याच परिसरात मृतावस्थेत आढळलेल्या उदमांजराच्या पोटातही याच रानडुकराचे मांस आढळले. त्यामुळे विषबाधेमुळेच या दोन्ही वाघांचा मृत्यू झाल्याच्या निष्कर्षाप्रत वन्यजीव विभाग पोहचला आहे. आता या रानडुकरावर विषप्रयोग कुणी केला याचा शोध घेतला जात आहे. वाघांचे मृतदेह आढळून आले त्या नागाच्या बोडीत शोधमोहीम राबविली जात आहे. परंतु अद्यापर्यंत वन्यजीव विभागाच्या हाती काहीही लागले नाही. नेमका रानडुकरावर विषप्रयोग कुणी केला आणि कोणत्या कारणासाठी केला याचा शोध घेतला जात आहे.
ठोस पुरावे गवसल्याचा ‘वन्यजीव’चा दावा
वन्यजीव विभागाच्या वतीने नागपूर व चंद्रपूर येथून पाचारण केलेल्या श्वानाच्या मदतीने दोन वाघांच्या मृत्यूचा शोध घेतला जात आहे. वन्यजीव विभागाच्या हाती महत्वपूर्ण सुगावे लागले असून त्या अनुषंगाने बुधवारी चौकशी करण्यात येणार आहे. अद्यापपर्यंत कुणालाही ताब्यात घेतले नसून संशयीत व्यक्तीची कसून चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सहाय्यक वनसंरक्षक गजानन बोबडे यांच्या मार्गदर्शनात तपास कार्य करण्यात येत आहे.