चिठ्ठीतील हस्ताक्षरावरून लागेल धानाचे पूंजणे जाळणाऱ्या आरोपींचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 04:09 PM2021-11-23T16:09:52+5:302021-11-23T16:35:51+5:30
दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी किन्ही येथे शेतशिवारातील तब्बल ३३ एकरातील धानाच्या पुंजन्याला आग लावली. यात १७ शेतकऱ्यांचे ८ लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले, या घटनेला ३ दिवस लोटले तरी पोलिसांना आरोपी पकडण्यात यश आलेले नाही.
भंडारा : दोन दिवसांपूर्वी साकोली तालुक्यातील किन्ही येथे अज्ञात आरोपींनी अंधाराचा फायदा घेत ३३ एकरातील धानाच्या १९ पुंजण्यांना आग लावून राखरांगोळी केली. यात शेतकऱ्यांचे ८ लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले. यात घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीतील हस्ताक्षरावरून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत तर शेतकरी मदतीसाठी धावपळ करीत आहेत. घटनेला तीन दिवसांचा कालावधी लोटला तरी पोलिसांना आरोपी पकडण्यात यश आलेले नाही.
घटनास्थळी शेतकऱ्यांना शासनातर्फे खरोखरच आर्थिक मदत मिळेल का हा संशोधनाचा विषय आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांनी जमेल तशी धानाची लागवड केली. धानाचे पुंजणेही तयार झाले पण धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. किन्ही येथे घटनास्थळावर एक चिठ्ठी सापडली त्याची त्यावरून काही लोकांचे नाव देण्यात आले होते. त्या इसमाची चौकशी केली असता इसम पुण्यात कंपनीत काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
चिठ्ठीतील अक्षरावरून आरोपींचा शोध घेण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदकडून पाच हजार रुपयांची मदत केली जाते मात्र शासन दरबारी असे एकरी २५ हजार रुपये मदत देण्याची कुठलीही तरतूद नाही. मागील तीन दिवसांपासून नुकसानग्रस्त शेतकरी पालकमंत्री तथा शासनाकडे पाठपुरावा करीत असून एकरी २५ हजार रुपयांची मदत द्या, अशी मागणी करीत आहेत मात्र अजूनपर्यंत त्यांच्या मागणीला यश आलेले नाही.