घरोघरी सिलेंडर पोहोचविणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घेतला लसीकरणाचा दुसरा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:26 AM2021-06-02T04:26:30+5:302021-06-02T04:26:30+5:30

भंडारा : कोरोना संक्रमण काळात सर्वांनाच आरोग्याबाबत चिंता सतावत आहे. त्यातच घरोघरी सिलेंडर पोहोचविणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आरोग्याच्या दृष्टीने लस घ्यावी, ...

The second dose of vaccination was taken by the staff delivering the cylinders to the house | घरोघरी सिलेंडर पोहोचविणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घेतला लसीकरणाचा दुसरा डोस

घरोघरी सिलेंडर पोहोचविणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घेतला लसीकरणाचा दुसरा डोस

Next

भंडारा : कोरोना संक्रमण काळात सर्वांनाच आरोग्याबाबत चिंता सतावत आहे. त्यातच घरोघरी सिलेंडर पोहोचविणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आरोग्याच्या दृष्टीने लस घ्यावी, याची खबरदारी घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील सिलेंडर पोहोचवणाऱ्या १२४ कर्मचाऱ्यांनी पहिली व दुसरी लस घेतली आहे.

भंडारा जिल्ह्यात २५ गॅस एजन्सी आहेत. या एजन्सीच्या माध्यमातून १२४ कर्मचारी घरोघरी सिलिंडर पोहोचविण्याचे काम करतात. कोरोना काळात त्यांच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ नये, तसेच दुसऱ्या लाटेची आशंका लक्षात घेता मार्च महिन्यातच या कर्मचाऱ्यांना लसीकरणाचा पहिला डोस देण्याबाबत पावले उचलण्यात आली. जिल्हा आरोग्य विभाग, पुरवठा विभाग व गॅस एजन्सी संचालकांनी पुढाकार घेत सिलेंडर डिलिव्हर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लस उपलब्ध करून देण्याबाबत मोठी भूमिका घेतली. याला या कर्मचाऱ्यांनी ही उस्फूर्तपणे सहभाग नोंदवत प्रथम व त्यानंतर दुसरा डोसही लावून घेतला आहे. दुसऱ्या लाटेत सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली व त्यातून ते बरेही झाले आहेत .

बॉक्स

सिलिंडर सॅनिटाईज केले काय?

घरोघरी सिलेंडर दिल्यानंतर ते सॅनिटाईज करण्याबाबतची भूमिकाही कर्मचारी स्पष्ट करीत आहेत. गॅस एजन्सी संचालकांनाही याबाबत तशी सूचना कर्मचाऱ्यांना दिली असल्याचे समजते. बचावात्मक पवित्रा म्हणूनही कर्मचारी मास्क, सॅनिटाईजर आदींचा उपयोग नियमितपणे करीत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.

बॉक्स

सहा कर्मचारी कोरोनाबाधित सार्वजनिक वितरण प्रणाली व जीवनावश्यक वस्तू सेवा अंतर्गत गॅस सिलेंडरचा समावेश होतो. त्यामुळे गॅस रिफील नोंदणी केल्यानंतर ते घरोघरी पोहोचवण्याचे काम कर्मचारी करतात. कोरोनाच्या पहिला व दुसऱ्या लाटेत या कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊन परिस्थितीतही घरोघरी जाऊन सिलेंडर वाटप केले. त्यामुळे जिल्ह्यातील सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली.

बॉक्स

डिलिव्हरी बॉय काय म्हणतात

संकटकाळ असला तरी आम्ही नियमितपणे घरोघरी जाऊन सिलिंडरचे वाटप केले. आम्हालाही आमच्या जीवाची काळजी वाटते. परंतु लस घेतल्यामुळे तेवढे टेन्शन राहिले नाही.

-कर्मचारी, भंडारा

कोरोना महामारीमुळे अनेकांचा मृत्यू झाला. त्यामुळे आम्हाला लस मिळेल तर योग्य होईल, अशी मागणी आम्ही केली होती. ती मागणी मार्च महिन्यातच पूर्ण करण्यात आली. आली आता मी दुसराही डोस घेतला आहे. त्यामुळे चिंतेची बाब नाही.

-कर्मचारी, पवनी

बॉक्स

जबाबदारी कुणाची

कोरोनामुळे विविध समस्या उद्भवत होती. गॅस सिलिंडर वितरण बाबतही आम्हाला समस्या आली होती, परंतु घरोघरी जाऊन सिलेंडर देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळातही इमानेइतबारे आपली जबाबदारी पार पाडली. त्यांच्या आरोग्याची काळजी घेत या कर्मचाऱ्यांना लस मिळण्याबाबत आम्ही आरोग्य विभाग व जिल्हा पुरवठा विभागाला अवगत केले. प्रशासनानेही आम्हाला योग्यरीत्या सहकार्य केल्याने जिल्ह्यातील या कर्मचाऱ्यांना दोन्ही डोस देण्यात यश आले आहे.

- डी. एफ. कोचे, गॅस वितरक, एचपी भंडारा.

शहरातील एकूण घरगुती गॅस धारक -१,९८,१५०

गॅस वितरित करणाऱ्या एजन्सी - २५

घरपोच डिलिव्हरीसाठी असलेले कर्मचारी - १२४

किती कर्मचाऱ्यांनी घेतला दुसरा डोस -१२४

एकही डोस न घेणारे कर्मचारी -००

Web Title: The second dose of vaccination was taken by the staff delivering the cylinders to the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.