सहा महिन्यांपासून घरकुलाचा दुसरा टप्पा अप्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:37 AM2021-05-08T04:37:31+5:302021-05-08T04:37:31+5:30
करडी ( पालोरा ) : मोहाडी तालुक्यातील पालोरा येथील 'ब' यादीतील लाभार्थिंना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाली आहेत. ...
करडी ( पालोरा ) : मोहाडी तालुक्यातील पालोरा येथील 'ब' यादीतील लाभार्थिंना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाली आहेत. पहिल्या टप्प्यातील अनुदान लाभार्थिंच्या खात्यात जमा करण्यात आल्याने बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र, ७५ टक्के बांधकाम होऊनही दुसरा व तिसरा टप्पा मिळाला नसल्याने लाभार्थी आर्थिक संकटात सापडले आहेत. महिनाभरात पावसाला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी घरांचे बांधकाम पूर्ण न झाल्यास राहावे कुठे, असा प्रश्न लाभार्थिंसमोर आहे.
घरकुल लाभार्थ्यांना प्रशासनाने वेळीच अनुदान दिले असते तर बांधकाम पूर्ण करता आले असते. मात्र, जुने राहते घर पाडून नव्या घर बांधकामाला सुरुवात करणारे लाभार्थी आता मात्र अनुदान मिळाले नसल्याने अडचणीत सापडले आहेत. मोहाडी कार्यालयात विचारणा करण्याकरिता गेले असता अनुदान बँकेत पाठविले असल्याचे लाभार्थिंना सांगितले जाते. बँकेत गेले असता अनुदान जमा झाले नसल्याचे सांगितले जाते.
हा प्रकार सहा महिन्यांपासून सुरू असून, लाभार्थी आर्थिक व मानसिक त्रास सहन करीत आहेत. पालोरा येथील घरकुल योजनेतील १६ लाभार्थिंचे पहिल्या टप्प्यातील अनुदान सहा महिन्यांपासून मिळालेले नाही. पहिल्या टप्प्यातील अनुदान मिळाल्याने ३ लाभार्थिंनी काम सुरू केले. मात्र, सहा महिन्यांचा कालावधी लोटत असतानाही दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. शासनाने घरकुलाचे अनुदान लाभार्थिंच्या खात्यात तत्काळ जमा करावे, अशी मागणी होत आहे.