४५ वर्षावरील नागरिकांनाच दिली जाणार दुसरी लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:35 AM2021-05-13T04:35:49+5:302021-05-13T04:35:49+5:30
भंडारा : जिल्ह्यात कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असून आता केवळ ४५ वर्षावरील नागरिकांना दुसरा डोस दिला जात आहे. पहिला ...
भंडारा : जिल्ह्यात कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असून आता केवळ ४५ वर्षावरील नागरिकांना दुसरा डोस दिला जात आहे. पहिला डोस घेण्यासाठी नागरिकांनी तूर्तास जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचेही लसीकरण जिल्ह्यात खोळंबले आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लस हाच प्रभावी उपाय आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ४५ वर्षावरील १ लाख ६७ हजार ९८२ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ३५ हजार आहे. कोरोना लसीची कमतरता भासत असल्याने आता जिल्ह्यात लसीकरण केंद्रावर केवळ ४५ वर्षावरील नागरिकांना दुसरा डोस दिला जात आहे. पहिला डोस घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात केंद्रावर पोहचत आहेत. परंतु अपुऱ्या लसीमुळे तेथे नोंदणीच केली जात नाही. नागरिकांनी काही काळ प्रतीक्षा करावी असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र दुसरा डोस घेण्यासाठी प्रत्येकाने या ठिकाणी जावे असे आवाहन करण्यात आले आहे. लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने केवळ दुसऱ्या डोसचीच व्यवस्था करण्यात आली आहे. दुसऱ्या डोससाठी नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. प्राध्यान्याने लसीचा दुसरा डोस घेऊन स्वत:ला सुरक्षित करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
१८ ते ४४ वयोगटासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र लसीच्या उपलब्धतेअभावी या गटाचे लसीकरण शासनाच्या सूचनेनुसार तूर्तास थांबविण्यात आले आहे. हा गट मोठा असून लसीकरणाबाबत एका बैठकीत चर्चा करण्यात आली.
दुसरा डोस प्राध्यान्याने घ्या - जिल्हाधिकारी
पहिला डोस घेणाऱ्या आरोग्यसेवक, फ्रंटलाइन वर्कर व ४५ वर्षावरील नागरिकांनी दुसरा डोस प्राध्यान्याने घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे. लसीकरण कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, डीएचओ डाॅ. प्रशांत उईके, डाॅ. माधुरी माथूरकर उपस्थित होते.