कर्कापुरात आगीचे रहस्य कायम
By admin | Published: April 15, 2017 12:29 AM2017-04-15T00:29:27+5:302017-04-15T00:29:27+5:30
तालुक्यातील कर्कापूर गावात मागील दोन दिवसांपासून आगीच्या रहस्यमयरीत्या घटना घडत आहेत.
गावात दहशत : दोन दिवसांत सहा घरे, गोठा व तणसाच्या ढिगाला आग
तुमसर : तालुक्यातील कर्कापूर गावात मागील दोन दिवसांपासून आगीच्या रहस्यमयरीत्या घटना घडत आहेत. १३ एप्रिल रोजी चार जणांचे घर, गोठा तणसाचे ढीग जळाले. १४ एप्रिलला दोघांचे घर व गोठा जळाला. आगीचे कारण कळू शकलेले नाही. १० वर्षापूर्वी आगीच्या अशा घटना घडल्या होत्या. त्यामुळे ग्रामस्थांत दहशत पसरली असून प्रशासन अजूनपर्यंत पोहचले नाही.
तुमसरपासून दहा किमी अंतरावर पूर्वेला कर्कापूर हे अडीच हजार लोकवस्तीचे गाव आहे. येथे शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. मागील दोन दिवसापासून गावात आगीच्या घटना घडत आहेत. १३ एप्रिल रोजी येथील महादेव कमा पडोळे यांचे घर जळाले. प्रदीप पांडूरंग आगाशे यांच्या घराला आग लागली. महेश आनंदराव बुध्दे यांचा गुराचा गोठा जळाला. मुकूंद रतिराम आगाशे यांच्या तणशीच्या ढिग जळून खाक झाले.
१४ एप्रिलला पुन्हा महादेव कमा पडोळे यांच्या घराला आग लागली तर माधोराव आगाशे यांच्या गुरांच्या गोठ्याला आग लागली. आगीचे कारण कळू शकले नाही. गाव दहशतीत आहे. दहा वर्षापुर्वी अशाच आगीच्या घटनेमुळे कर्कापूर गाव चर्चेत आले होते. आगीचे रहस्य अद्याप कायम आहे. सध्या येथील ग्रामस्थ रात्र जागून काढत आहेत. प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही. ग्रामस्थांनी आग विझविली. आगीच्या घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडत आहेत. एका घराला अथवा तणसीच्या ठिगाला आग लागली तर लगेच दुसऱ्या घराला नेमकी त्याच वेळेला आग लागते. प्रशासनाने येथे दखल घेण्याची गरज आहे. येथील ग्रामस्थ अभय मिश्रा तथा गणेश सिंदपूरे यांनी आगीचे रहस्य उलगडून ग्रामस्थांची भीती दूर करण्याची मागणी केली आहे. गावात आगीवर नियंत्रण प्रस्थापित करणारी यंत्रणेची व्यवस्था करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)