‘जय’च्या बेपत्ता होण्याचे गूढ कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:28 AM2019-04-18T00:28:32+5:302019-04-18T00:29:28+5:30

महाराष्ट्रातील सर्वात मोठा, भारतातील क्रमांक दोनचा वाघ असलेला आणि आशियाचा आयकॉन ठरलेला जय नामक वाघ बेपत्ता होऊन आता तीन वर्ष झाली. या तीन वर्षात जयचा शोध घेण्यात वनविभागाला अपयश आले असून त्याच्या बेपत्ता होण्याचे गूढ अद्यापही कायम आहे.

The secret of 'Jay' disappear forever | ‘जय’च्या बेपत्ता होण्याचे गूढ कायमच

‘जय’च्या बेपत्ता होण्याचे गूढ कायमच

Next
ठळक मुद्देतीन वर्षापासून थांगपत्ता नाही : वनविभाग अपयशी, १८ एप्रिल २०१६ ला झाले होते अखेरचे दर्शन

लक्ष्मीकांत तागडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : महाराष्ट्रातील सर्वात मोठा, भारतातील क्रमांक दोनचा वाघ असलेला आणि आशियाचा आयकॉन ठरलेला जय नामक वाघ बेपत्ता होऊन आता तीन वर्ष झाली. या तीन वर्षात जयचा शोध घेण्यात वनविभागाला अपयश आले असून त्याच्या बेपत्ता होण्याचे गूढ अद्यापही कायम आहे. विशेष म्हणजे १८ एप्रिल २०१६ रोजी पवनी वनक्षेत्रातील डोंगरमहादेव परिसरात जयचे अखेरचे दर्शन पर्यटकांना झाले होते.
पवनी-कºहांडला अभयारण्याची शान असलेला जय हा देखणा वाघ होता. तो गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यातील सर्वप्रथम पवनी तालुक्याच्या डोंगर महादेव, खापरी परिसरात जून २०१३ मध्ये आला होता. तेव्हा तो केवळ अडीच वर्षाचा होता. जयला येथील विस्तीर्ण घनदाट जंगल कमालीचे आवडले. या जंगलाचा समावेश नंतर पवनी कºहांडला अभयारण्यात करण्यात आला. काही दिवसातच जय हा वाघ अभयारण्याचा प्राण ठरला. पर्यटक मोठ्या संख्येने जयला पाहण्यासाठी येत होते. १० दिवसापर्यंत आॅनलाईन बुकींग पॅक राहात होते. अनेक मोठी मंडळी जयला पाहण्यासाठी हजारो किमीचे अंतर कापून आली होती.
जयच्या विविध गुणांमुळे तो भारतातील महत्वपूर्ण वाघ ठरला होता. कोणताही वाघ १०० किमी परिसरात फिरतो. पण जय हा अभयारण्याच्या १८९ किमी व प्रादेशिक वनविभागाच्या १०० किमी असा २५० किमी जंगलात मुक्तपणे फिरत होता. जय हा अभयारण्याच्या पवनी वनक्षेत्रात आठ दिवस तर आठ दिवस भिवापूर - कºहांडला परिसरात राहत होता. गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढल्याने मरु नदी पूर्ण भरली असायची. त्यावेळी जय नदी पोहून जात होता. परंतु जून २०१६ मध्ये जय बेपत्ता झाल्याची माहिती बाहेर येऊ लागली. सुरुवातीला वनविभागाने कानावर हात ठेवले. पण थोड्याच दिवसात जय बेपत्ता झाल्याची अधिकृत घोषणा वनविभागाला करावी लागली.
जयचा प्रवेश झाला तो पवनीच्या जंगलातून व नाहिसा झाला तोही पवनीतूनच. गत तीन वर्षापासून जयच्या बेपत्ता होण्याचे गुढ वनविभागाला उकलता आले नाही. याचा परिणाम पर्यटकांवर झाला आहे. आजही जयच्या सुरस कथा परिसरात सांगत जातात. जयची देखणी छबी आजही अनेकांच्या डोळ्यापुढे आहे. मात्र तीन वर्ष झाले तरी त्याच्या बेपत्ता होण्याचे गूढ सोडविण्यात यश आले नाही.

अखेरच्या पाऊलखुणा बेटाळा शिवारात
अचानक बेपत्ता झालेल्या जयच्या शेवटच्या पाऊलखुणा पवनी जवळील बेटाळा शिवारात आढळून आल्या. जयला लावण्यात आलेल्या कॉलर आयडीची ही अखेरची नोंद ठरली. तो कुठे गेला, त्याचे काय झाले याचा थांगपत्ता लागला नाही. दुसरीकडे वनविभागाने ‘मिशन जय सर्च’ मोहीम राबविली. जीपीएस नुसार १८ एप्रिल २०१६ ला जय चे लोकेशन आढळले. विशेष म्हणजे जय हा आपला नेहमीचा मार्ग सोडून निघाला होता. ज्या शेतात पायाचे ठसे आढळून आले तेथून २०० फुटावर पवनी-नागपूर हा डांबरी रस्ता आहे. याच दिवशी म्हणजे १८ एप्रिल २०१६ ला अभयारण्याच्या पवनी वन्यजीव क्षेत्रातील डोंगरमहादेव परिसरातील शेंडा पिंपरी नावाच्या प्रसिद्ध बोडीत तो पाण्यात डुंबून असल्याचा अनेक पर्यटकांना दिसला होता.

पर्यटकांना घालायचा भुरळ
भारदस्त शरीरयष्टी, चेहऱ्याची सुंदरता, विलक्षण चपळ आदी गुणांमुळे जय हा पर्यटकांना भुरळ घालीत होता. अल्पावधीतच जयने या अभयारण्याच्या व प्रादेशिक वनविभागाच्या जंगलात आपले साम्राज्य निर्माण केले. अनेक मोठ्या वाघांना त्याने पळवून लावले.
माणसावर कधी हल्ला केला नाही
बिनधास्तपणे जंगलात संचार करणारा जय वाघ सर्वांचा लाडका झाला होता. नागझिरा जंगलात माणसांना जवळून पाहणारा जय कोणालाही घाबरत नव्हता. त्याने कधीही माणसावर हल्ला केला नाही. असा हा दिलदार मनाचा देखणा वाघ अचानक बेपत्ता झाला.

Web Title: The secret of 'Jay' disappear forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ