५८ गावांची सुरक्षा केवळ ३१ पोलिसांच्या खांद्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 05:00 AM2020-05-06T05:00:00+5:302020-05-06T05:00:16+5:30
कर्तव्य बजावताना येणाऱ्या विविध अडचणी त्यातूनच बाजार चौकातून गेलेला अड्याळ-पालांदूर-दिघोरी-चिचगड हा राज्यमार्ग. शिवाय नक्षलग्रस्त व जंगलव्याप्त परिसर त्यामुळे पालांदूर (चौ.) येथील पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांना कर्तव्य बजावताना एक प्रकारे तारेवरची कसरतच करावी लागते. तशातच अपुऱ्या संख्याबळामुळे २४ तास काम करावे लागत असल्याने मानसिकतेवर विपरित परिणाम होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : लाखनी तालुक्यातील सर्वात मोठे गाव व संवेदनशील पोलीस ठाणे अशी पालांदूर (चौ.) येथील ख्यातीप्राप्त पोलीस ठाण्यात अधिकारी व कर्मचारी यांची कमतरता आहे. ५८ गावातील एक लाखाच्या आसपास जनतेच्या रक्षणाची जबाबदारी फक्त ३१ पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांवर असल्याने जनहिताचा विचार करून या पालांदूर (चौ.) पोलीस ठाण्यातील मनुष्यबळ वाढवून अधिकाऱ्यांची व कर्मचाºयांची रिक्त जागा भरण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
कर्तव्य बजावताना येणाऱ्या विविध अडचणी त्यातूनच बाजार चौकातून गेलेला अड्याळ-पालांदूर-दिघोरी-चिचगड हा राज्यमार्ग. शिवाय नक्षलग्रस्त व जंगलव्याप्त परिसर त्यामुळे पालांदूर (चौ.) येथील पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांना कर्तव्य बजावताना एक प्रकारे तारेवरची कसरतच करावी लागते. तशातच अपुऱ्या संख्याबळामुळे २४ तास काम करावे लागत असल्याने मानसिकतेवर विपरित परिणाम होत आहे.
जनतेच्या जीवीताची व मालपत्तेची योग्यरित्या संरक्षण द्यावे, गुन्हेगारांवर वचक बसावा, परिसरात शांतता व सुव्यवस्था राहावी तसेच कायद्याचे राज्य प्रस्थापित व्हावे यासाठी गृह विभागाद्वारे पोलीस दलाची निर्मिती करण्यात आली आहे. दररोज दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या व त्यामानाने अपुरा अधिकारी व कर्मचारी तसेच कामाचा वाढता व्याप यामुळे पोलिसांना आपले कर्तव्य बजावताना अनेक प्रकारच्या अडीअडचणींचा सामना करावा लागतो.
इतर कर्मचाºयांप्रमाणे पोलिसांच्या संघटना नसल्याने कितीही अडचणी असल्या तरी त्यांना आपले तोंड दाबून गप्प बसावे लागते.
पालांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकुण ५८ गावांचा समावेश केलेला असून त्यात ३ गावे रिठी आहेत. लोकसंख्या अंदाजे एक लाखाच्या आसपास आहे.
यात लाखांदूर तालुक्यात समाविष्ट केलेल्या गावांपैकी तिरखुरी, तई, पाऊलदौना, सोनेगाव, पेंढरी, पाचगाव, बेलाटी ही गावे पालांदूर पोलीस ठाण्यात येतात.
तसेच मचारणा, मांगली, सायगाव, किटाडी, गोंदी, देवरी, इसापूर आदी गावे ही घनदाट जंगलाजवळ वसलेली आहेत. पोलीस ठाण्याचे कामकाज योग्यरितीने चालण्याकरिता पालांदूर, किटाडी, गुरठा व भूगाव अशा चार बिटांची निर्मिती करण्यात आली आहे.
याशिवाय महत्वाच्या व्यक्तीची सुरक्षा, उत्सव व यात्रा, आंदोलने, नेत्यांचे दौरे, सभा संमेलने, सध्या कोरोना असल्यामुळे बंद असून या ठिकाणी सुद्धा याच संख्याबळातून सुरक्षा प्रदान करावी लागते. त्यामुळे संख्या बळाच्या कमतरतेअभावी पालांदूर व परिसरातील अवैध धंदे, अवैध दारु विक्री, अवैध रेती तस्करी, उत्खनन व वाहतूक यावर वचक नसते व अवैध धंदे फोफावण्यास वाव मिळत आहे. वाढती लोकसंख्या व गुन्हेगारीची आकडेवारी लक्षात घेता अधिकारी व कर्मचारी संख्या वाढवून भंडाराचे पोलीस अधीक्षकांनी विशेष लक्ष देऊन अनेक दिवसांपासून रिक्त असलेले पोलीस उपनिरीक्षक हे पद भरण्याची व अवैध गौण खनिज उत्खननावर अंकुश लावण्याची मागणी जोर धरत आहे.
रिक्त पदांमुळे पडतोय कर्मचाऱ्यांवर ताण
सदर पोलीस ठाण्यात एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, ८ हवालदार, ४ सहाय्यक फौजदार, १३ शिपाई व ६ पोलीस नायक असे एकुण ३१ अधिकारी व एक पोलीस निरीक्षक अशी २ + ३५ पदे मंजूर असताना सध्या स्थितीत १ + २५ इतक्या पदावर समाधान मानावे लागत असून त्यातही पोलीस उपनिरीक्षक हे पद कायमस्वरुपी रिक्त असल्याचे समजते. यातीलही रोजचे दैनंदिन कामकाज करण्याकरिता स्टेशन डायरी १, वायरलेस १, वाहतूक पोलीस १, कोर्ट पैरवी १, समन्स वॉरंट १, चालक १ असे अर्धे कर्मचारी कर्तव्यावर ठेवावे लागतात. या पोलीस ठाण्यात अधिकारी कर्मचाऱ्यांची कमतरता असताना सुद्धा बंदोबस्त, इतर कर्तव्य, आवक, जावक, क्राईम रायटर, गोपनीय विभाग आदी कामांकरिता याच संख्याबळातून कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जात असल्याने इतर तपासावर विपरित परिणाम होत असल्याचे दिसते.