लाखांदूर तालुक्यात बियाणे कंपन्यांचे जाहिरात युद्ध

By admin | Published: May 23, 2016 12:38 AM2016-05-23T00:38:24+5:302016-05-23T00:38:24+5:30

लाखांदूर तालुक्यात रबी हंगामातील शेतीची कामे संपत नाही तोच खरीप हंगामाच्या पीक लागवडीसाठी विविध बी-बियाणे कंपनी ...

Seed companies promote war in Lakhandur taluka | लाखांदूर तालुक्यात बियाणे कंपन्यांचे जाहिरात युद्ध

लाखांदूर तालुक्यात बियाणे कंपन्यांचे जाहिरात युद्ध

Next

खरीपासाठी कंपन्यांची तयारी : बोगस बियाणे निघाल्यास कंपन्यांचे वर हात, विक्रेत्यांकडून विविध प्रकारचे आमिष
प्रमोद प्रधान लाखांदूर
लाखांदूर तालुक्यात रबी हंगामातील शेतीची कामे संपत नाही तोच खरीप हंगामाच्या पीक लागवडीसाठी विविध बी-बियाणे कंपनी विक्रेत्यांनी ग्रामीण भागातून आकर्षक जाहिरातींचा भडीमार शेतकऱ्यांवर सुरू केला. एकदा नामांकीत कंपनीचे विकलेले बियाणे बोगस निघाल्यानंतर वरहात करतात. यामुळे बळीराजा मात्र आर्थिक तोटा सहन करित आपली फसगत झाल्याचे मान्य करुन कपाळावर हात ठेवतो.
मोजता येईना ईतक्या बियाणांच्या कंपण्यांनी उत्पन्न वाढीचे आमिष देत तालुक्यात धुडगूस घातला. धान, तूर, सोयाबीन या पिकांच्या बियाण्यांची जाहिरात करताना कमी दिवसांत येणारे वाण, अत्यल्प प्रमाणात व कमी दिवसांत येणारे वाण, कमी पावसावर येणारे वाण, भरघोस उत्पादन देणारे वाण, सर्वाधिक बाजारभाव मिळवून देणारे वाण केवळ आमच्याच कंपनीने विकसित केले आहे, असा दावा बियाणे कंपन्या करीत आहेत. काही बियाणे निर्मिती कंपन्या तर भारूड, पथनाट्य, विनोद अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून गावागावांतून हजारोंची गर्दी खेचत आहे. धानासारख्या वाणाची जोरदार जाहिरात केली जात आहे. शेतकऱ्यांचे कर्ज, अनियमित पाऊस यामुळे झालेली वाताहत, दुष्काळ बाजारभाव, अशा जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आत्मियतेने बोलत शेतकऱ्यांच्या भावनेला हात घातला जात आहे. आपल्या कंपनीने तयार केलेल्या बियाण्यांची लागवड केल्यास शेतात सोनेच पिकेल. तुम्ही कर्जमुक्त व्हाल, असा विश्वास शेतकऱ्यांवर लादत शेतकऱ्यांना चांगलीच भुरळ पाडत आहेत. आकर्षक फलकाने सजविलेल्या वाहनातून बियाण्यांची जाहिरात बियाणे कंपनीकडून केली जात आहे. मुख्य रस्त्यावरचे दिशादर्शक फलक तर कंपन्याच्या जाहिरातीने बुजून गेले आहेत. शासकीय फलक सुद्धा कंपन्यांना जाहिरातीकरिता कमी गेले आहेत. औषधी बी-बियाणे यांच्या अवाजवी किमती लावून जाहिरात तंत्राचा वापर करून शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशाची लूट करीत आहेत. आकर्षक तंत्र वापरून तयार केलेले पोस्टर्स गावागावांत लावले जात आहे. याला कार्यक्रमातून आमच्याच कंपनीचे बियाणे किती फायद्याचे आहे, हे पटवून देण्यात येत आहे.
या विविध कंपन्यांच्या मोहक जाहिरातीला बळी पडून कर्जाचे डोंगर उचलून बळीराजा पारंपारीक बी - बियाणांकडे पाठ फिरवतो व महागडे बियाणे विकत घेतो. मात्र त्याच महागड्या बियाणांची उगवण क्षमता वेळेवर दिसत नसल्याने जेव्हा बळीराजा कंपनीकडे दाद मागतो, तेव्हा तेच कंपणीवाले बळीराजावर वरचढ होवून शास्त्रशुद्ध पध्दतीने शेती न केल्याचा उलट आरोप करतात. तशाही परीस्थीतीत शेतकरी धानाची रोवणी आटोपतो. परंतु धान पिकाची जेव्हा गर्भावस्थेत वाईट परिस्थिती असते व एकुणच उत्पादनाची टक्केवारी निम्यावर येते, तेव्हा मात्र शेतकरी रडकुंडीवर येउन फसगत झाल्याचे मान्य करतो. या वेळी शेतकऱ्यांची ऐकुण घेणारा कुणीही नसतो. मग नामांकीत कंपन्यांचे बियाणे ब्रॉण्डेड कसे असा प्रश्न आपसुकच निर्माण होतो. मागील वर्षी शेतकऱ्यांच्या बियाणांच्या बाबतीत अनेक बोंबा होत्या मात्र तो विषय कुणीही गांभीयार्ने हाताळला नाही.

महागड्या बियाण्यांच्या जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च
बियाणे निर्मिती करणाऱ्या कंपन्या आपल्या मालाचा सर्वाधिक खप घेण्यासाठी जाहिरातीचा कोट्यवधी रुपयांचा खर्च करतात. गावागावांतील कृषी केंद्रधारकांना आकर्षक सवलती देऊन अँडव्हान्स बुकिंग केली जाते. सरासरी व सर्वाधिक खप करणाऱ्या डिलरला विविध आकर्षक बक्षिसे, सोन्याचे दागिने, रोख रक्कम, पर्यटनस्थळांच्या सहली कधी देशात तर कधी विदेशातही विमान प्रवास दिला जात आहे
कृषी विभागाच्या भरारी पथकांची भूमिका संशयास्पद
तालुक्यातील सर्व परवानाधारक कृषि केंद्रावर तालुका कृषि विभाग व पंचायत समिती कृषि विभागाच्या संगातमताने भरारी पथक तयार करुन बियाणे, औषधी, रासायनिक खते खरेदी व विक्रीवर तसेच त्यांची गुणवत्ता बरोवर आहे की नाही, या सर्व बाबी तपासण्याचे अधिकार असतात. मग हे सर्व असताना बळीराजाची फसगत कशी काय होते, बोगस बियाणे निघाल्यास शेतकऱ्यांना न्याय का मिळत नाही, म्हणून शेतकऱ्यांपुढे प्रश्न निर्माण होतो. कृषी विभागाच्या भरारी पथकाची भूमीका संशयास्पद असल्याने हा सर्व प्रकार पडद्याआड केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातो. यंदाच्या खरीप हंगामात तरी भरारी पथक आपली भूमीका प्रामाणीकपणे पार पाडणार काय ? असा प्रश्न उपस्थीत करुन शेतकऱ्यांची होणारी फसगत थांबेल का म्हणून लक्ष आहे.

Web Title: Seed companies promote war in Lakhandur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.