रेती वाहतुकीचे १९ ट्रक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 06:00 AM2019-08-24T06:00:00+5:302019-08-24T06:00:35+5:30
भंडारा जिल्हा नैसर्गीक साधन संपत्तीने परिपूर्ण आहे. जिल्ह्याची जीवनदायी असलेल्या वैनगंगेची रेती संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. त्यामुळेच येथील रेतीवर तस्करांचा डोळा असतो. जेसीबीच्या माध्यमाने उत्खनन करून ट्रक, ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केली जाते. शासकीय महसूलाला चुना लागण्यासोबतच नैसर्गीक साधान संपत्तीचे अपरमीत नुकसान होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वैनगंगा नदीपात्रातून रेतीची अवैध तस्करी करणाऱ्यांविरूद्ध महसूल व पोलीस प्रशासनाने धडक कारवाईस प्रारंभ केला असून भंडारा येथे रेती वाहतुकीची १९ ट्रक जप्त करण्यात आले. या रेती तस्करांना ४७ लाख ८८ हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या धडक कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.
भंडारा जिल्हा नैसर्गीक साधन संपत्तीने परिपूर्ण आहे. जिल्ह्याची जीवनदायी असलेल्या वैनगंगेची रेती संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. त्यामुळेच येथील रेतीवर तस्करांचा डोळा असतो. जेसीबीच्या माध्यमाने उत्खनन करून ट्रक, ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केली जाते. शासकीय महसूलाला चुना लागण्यासोबतच नैसर्गीक साधान संपत्तीचे अपरमीत नुकसान होते. अवजड वाहतुकीमुळे भंडारा जिल्ह्यातील रस्त्यांची चाळण झाली आहे. गत काही दिवसांपासून या तस्करांनी अक्षश: धुमाकूळ घातला होता.
डॉ. नरेश गिते यांनी जिल्हाधिकारी पदाचा प्रभार घेताच अवैध रेती उत्खनणावर लक्ष केंद्रीत केले. महसूल पोलीस आणि परिवहन विभागाच्या समन्वयाने कारवाई करण्याचे निर्देश दिले. कारवाई करताना कोणतीही व्यक्ती व संस्थेला सूट दिली जाणार नाही, याची दक्षता घेतली.
त्यामुळेच अवघ्या काही दिवसात रेती तस्करांच्या मुसक्या आवळणे सुरू झाले. ७ आॅगस्ट रोजी दोन ट्रक पकडून दहा ब्रास रेती जप्त करण्यात आली. ट्रक मालकांना पाच लाख ४० हजार रूपये दंड ठोठावण्यात आला. ९ आॅगस्ट रोजी पाच ट्रकवर कारवाई करून २५ ब्रास रेती जप्त करण्यात आली.
१२ लाख ६० हजार रूपये दंड ठोठावण्यात आला. तर शुक्रवार २३ आॅगस्ट रोजी तब्बल १२ ट्रक पकडून ६० ब्रास रेती जप्त करण्यात आली. ३० लाख २४ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. अवघ्या तीन कारवाईत ४७ लाख ८८ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला.
ही कारवाई जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वी करण्यात आली. यासाठी संबंधित विभाग प्रमुख खनिकर्म शाखा, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार सहभागी झाले आहेत. पोलिस आणि महसूल प्रशासन एकत्र येवून कारवाई करत असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.
रेती डम्पिंगवर करडी नजर
जिल्ह्यातील नदीपात्र पावसामुळे तुडूंब झाले आहे. परंतु अनेक रेतीमाफियांनी पावसाळ्यापुर्वी मोठ्या प्रमाणात रेतीचे डम्पिंग करून ठेवले आहे. असा रेतीसाठा सध्या प्रशासनाच्या रडारवर आहे. शेतकरी, नागरिकांनी आपल्या खाजगी जागेवर अवैध रेतीसाठा होणार नाही याची दक्षता घ्यावी, अज्ञात व्यक्तीने साठा केल्यास त्याची तक्रार तहसीलदारांकडे करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
भंडारा जिल्ह्यातील नैसर्गिक साधन संपत्तीची व पायाभूत सुविधांचा नाश कदापी होवू देणार नाही. रेती तस्करांविरूद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल. अवैध रेती उत्खनन व वाहतुकदारांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
-डॉ. नरेश गिते, जिल्हाधिकारी भंडारा.