तहसीलदारांनी जप्त केलेल्या रेतीची पुन्हा चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 11:14 PM2018-08-14T23:14:22+5:302018-08-14T23:14:58+5:30
मोहगाव (टोली) ते सूर नदी रोहणा रस्त्याच्या कडेला रेती माफियांनी सूर नदी पात्रातील रेती काढून मोठमोठे ढिगारे तयार करून ठेवले होते व ही रेती दररोज रात्रीला दहा चाकी टिप्परद्वारे नागपूरला पोहचविली जात होती. याची तक्रार नागरिकांनी महसूल विभागाला केल्यावर तहसीलदारांनी १३ आॅगस्टच्या सायंकाळी दोन पोलिसांसोबत जावून ते रेतीचे ढिगारे जप्त केले. मात्र जप्त केलेल्या त्या ढिगाऱ्याची रेती चोरांनी रात्रभरात पार साफ करून टाकल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. मात्र या प्रकरणात आता सावरासावर केली जात आहे.
सिराज शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : मोहगाव (टोली) ते सूर नदी रोहणा रस्त्याच्या कडेला रेती माफियांनी सूर नदी पात्रातील रेती काढून मोठमोठे ढिगारे तयार करून ठेवले होते व ही रेती दररोज रात्रीला दहा चाकी टिप्परद्वारे नागपूरला पोहचविली जात होती. याची तक्रार नागरिकांनी महसूल विभागाला केल्यावर तहसीलदारांनी १३ आॅगस्टच्या सायंकाळी दोन पोलिसांसोबत जावून ते रेतीचे ढिगारे जप्त केले. मात्र जप्त केलेल्या त्या ढिगाऱ्याची रेती चोरांनी रात्रभरात पार साफ करून टाकल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. मात्र या प्रकरणात आता सावरासावर केली जात आहे.
मोहगाव (टोली) रेती घाटाजवळील एक रेतीचा ढिगारा तहसीलदार मोहाडी यांनी जप्त करून त्याचा लिलाव केला. मात्र त्याच्या जवळच मोहगाव (टोली) ते सूरनदीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला रेती माफियांनी वाघमारे यांच्या शेताजवळ सूर नदीच्या पात्रातील रेती काढून मोठमोठे रेतीचे ढिगारे तयार केले होते. अनेक दिवसापासून दररोज रात्री दोन वाजेपासून पहाटे सात ते आठ वाजेपर्यंत जेसीबीच्या सहाय्याने नदीपात्रातून रेती काढून ती रेती ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाघमारे यांच्या शेताजवळील खुल्या जागेत जमा करण्यात येत होती. दिवसभर येथे कोणतीही हालचाल दिसत नव्हती. मात्र रात्री आठ वाजेनंतर या ठिकाणी दहा चाकी टिप्पर व ट्रकच्या रांगा लागायच्या व जमा केलेली संपूर्ण रेती रात्रभरात साफ केली जायची. हा नित्यक्रम होता. जिल्हा परिषदेच्या त्या रस्त्याची पुरती वाट लागलेली होती. नागरिकांना येण्याजाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.
मी ते ढिगारे जप्त केलेले नव्हते. मी व माझे सहकारी तथा पोलीस काल जेव्हा गेलो तर रस्त्यावर विटांच्या तुकड्याने रस्ता अडविण्यात आला होता. विटांचे तुकडे हटवून पुढे गेलो तर रस्त्यावर मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला होता. जेणेकरून आम्हाला तेथे पोहचता येवू नये. खड्डा बुजविण्यापर्यंत तेथील पाच, सहा टिप्पर व जेसीबी दुसºया रस्त्याने पळून गेले. ते ढिगारे तलाठ्यांनी चारपाच दिवसापूर्वीच जप्त केले होते. तेथील संपूर्ण रेती चोरीला गेली की नाही याची चौकशी करणार आहे.
-सूर्यकांत पाटील, तहसीलदार, मोहाडी.