अमोल पदवाड यांची हॉर्नबी ट्रस्टवर निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:34 AM2021-03-21T04:34:25+5:302021-03-21T04:34:25+5:30
भंडारा : दिल्लीस्थित डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठातील इंग्रजी भाषा केंद्राचे संचालक प्रोफेसर डाॅ. अमोल पदवाड यांची इंग्लंडमधील प्रसिद्ध ...
भंडारा : दिल्लीस्थित डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठातील इंग्रजी भाषा केंद्राचे संचालक प्रोफेसर डाॅ. अमोल पदवाड यांची इंग्लंडमधील प्रसिद्ध ए. एस. हॉर्नबी ट्रस्टवर विश्वस्त म्हणून निवड करण्यात आली आहे. भंडारा येथील रहिवासी असलेले डॉ. पदवाड हे येथील जे. एम. पटेल महाविद्यालयात इंग्रजी विभाग प्रमुख होते. डाॅ. पदवाड यांच्या निवडीने प्रथमत: आशिया खंडातून विशेषकरून भारताला प्रतिनिधित्व प्राप्त झाले आहे.
विख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि ऑक्सफर्ड इंग्रजी डिक्शनरीचे रचयिते ए. एस. हॉर्नबी यांच्या स्मरणार्थ स्थापन झालेली ही साठ वर्षे जुनी संस्था आहे. जगभरातील इंग्रजी भाषा शिक्षकांसाठी विविध उपक्रम राबवीत असते. दरवर्षी विविध देशांतील निवडक इंग्रजी भाषा शिक्षकांना इंग्लंडमध्ये विशेष प्रशिक्षणासाठी एक वर्षाची शिष्यवृत्ती ट्रस्टतर्फे दिली जाते. याशिवाय इंग्रजी भाषा प्रशिक्षण संशोधन शिक्षक संघटनांची वृद्धी, इंग्रजी भाषा व सामाजिक न्याय, यासारखे असंख्य उपक्रम या ट्रस्टमार्फत राबविण्यात येतात. ट्रस्टच्या सात सदस्यीय विश्वस्त मंडळावर निवड होणारे डॉ. पदवाड हे ट्रस्टच्या इतिहासातील पहिले इंग्लंडबाहेरील व्यक्ती आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे वीस वर्षांपूर्वी डॉ. पदवाड यांना इंग्लंडमधील लीड्स विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी हॉर्नबी शिष्यवृत्ती मिळाली होती. तसेच नंतर हॉर्नबी यांच्या ऑक्सफर्ड ॲडव्हान्स डिक्शनरीच्या आठव्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत योगदान देण्याचा मानही प्रा. पदवाड यांना मिळाला होता.