विद्यादानाच्या पवित्र मंदिरात विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:14 AM2019-04-27T00:14:04+5:302019-04-27T00:15:21+5:30
चार भिंतीच्या आड केवळ पुस्तकी ज्ञान मिळते. परंतु या पुस्तकी ज्ञानात विद्यार्थ्यांना मर्यादित न ठेवता निसर्गाच्या सानिध्यातून जीवन समृद्ध करण्याचा उपक्रम सध्या लाखनी तालुक्यातील निमगावच्या शाळेत सुरू आहे.
मुखरू बागडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : चार भिंतीच्या आड केवळ पुस्तकी ज्ञान मिळते. परंतु या पुस्तकी ज्ञानात विद्यार्थ्यांना मर्यादित न ठेवता निसर्गाच्या सानिध्यातून जीवन समृद्ध करण्याचा उपक्रम सध्या लाखनी तालुक्यातील निमगावच्या शाळेत सुरू आहे. स्किल इंडियाला शोभेल असा हा उपक्रम असून विद्यार्थ्यांना पळसाच्या पानापासून पत्रावळी आणि द्रोण तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. या पत्रावळी आणि द्रोणांची अल्प दरात विक्री केली जात आहे.
निमगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक डमदेव कहालकर हे उपक्रमशिल शिक्षक म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. विविध उपक्रम राबविताना आता त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जीवनविषयक कौशल्य निर्माण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. स्किल इंडिया ही शासनाची योजना असली तरी शालेय विद्यार्थ्यांपर्यंत ती पोहचली नाही. मात्र निमगावच्या शाळेतील विद्यार्थी स्किल इंडियाचा अनुभव घेत द्रोण आणि पत्रावळी लिलया तयार करीत आहे.
ग्रामीण भागात पूर्वी पत्रावळीला मोठी मागणी होती. मात्र अलीकडे प्लॉस्टिकचा वापर वाढला. पळस आणि मोहा पानापासून तयार होणारी पत्रावळी हद्दपार झाली. परंतु शासनाने आता प्लॉस्टिकवर बंदी आणली. पर्यायाने लग्न समारंभात पानाच्या पत्रवाळीचा उपयोग होवू लागला. मात्र पत्रावळी तयार करणारे गावात कोणी उरलेच नाही. ही उणीव लक्षात घेवून मुख्याध्यापक डमदेव कहालकर, शिक्षक विजय डाभरे, रामकृष्ण कमाने, मीरा कहालकर, भास्कर गरपडे यांनी विद्यार्थ्यांना पत्रावळी तयार करण्याचे प्रशिक्षण निश्चय केला. आता विद्यार्थी पळसाच्या पानापासून पत्रावळी बनवित आहेत. गावाशेजारी माळरानावरून पळसाचे पाने तोडून आणून त्यापासून पत्रावळी तयार होत आहे. विद्यार्थीही उत्साहाने यात सहभागी होत आहेत.
अल्प दरात पत्रावळीची विक्री
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या पत्रावळीची अत्यल्प दरात विक्री करण्याचा शिक्षकांचा मनोदय आहे. या उपक्रमातून हाती येणारा पैसा शाळा, परिसर विकासासाठी लावला जाणार आहे. शिक्षकांचा हा उपक्रम सर्वांसाठी कौतुकाचा विषय झाला आहे. निसर्गाशी नाते जोडत अनोख्या संस्कृतीशी सांगड घालणारा हा उपक्रम होय. शाळेत विद्यार्थी सकाळपासून उपस्थित राहून पत्रावळी तयार करतात. पत्रावळी आणि द्रोण कसे तयार करायचे यांचे त्यांना प्रशिक्षण दिल्या जातो. कौशल्य भारत, कुशल भारत योजना जणू निमगावच्या शाळेत शिक्षक राबवित असल्याचे दिसून येत आहे.