आता शिक्षकांना काढावा लागेल विद्यार्थ्यांसोबत 'सेल्फी'

By admin | Published: November 7, 2016 12:49 AM2016-11-07T00:49:29+5:302016-11-07T00:49:29+5:30

स्थलांतरित व शाळेत अनियमित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत;...

"Selfie" with students now | आता शिक्षकांना काढावा लागेल विद्यार्थ्यांसोबत 'सेल्फी'

आता शिक्षकांना काढावा लागेल विद्यार्थ्यांसोबत 'सेल्फी'

Next

अनियमित विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न : सेल्फी काढून संकेतस्थळावर अपलोड करण्याचा आदेश
भंडारा : स्थलांतरित व शाळेत अनियमित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत; पण शाळेच्या परिसरात राहूनही वर्गात बुट्टी मारण्याचे प्रमाण कमी झाले नाही. यामुळे हे विद्यार्थी शाळेत येतात की नाही, हे शिक्षण विभागासमोर सिद्ध करण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढून संबंधित संकेतस्थळावर अपलोड करावे, असा अफलातून आदेश शासनाने जारी केला आहे.
मागील शैक्षणिक वर्षात गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमांतर्गत काही योजना सुरू करण्यात आल्या; पण प्रगत शाळांची संख्या ६० टक्क्यांच्या पलिकडे जाऊ शकली नाही. यामुळे शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी शासनाने ही मोहीम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध यंत्रणांच्या पाहणीनुसार शासनाने शाळाबाह्य मुलांचे तीन प्रकार जाहीर केले. यात स्थलांतरित कुटुंबासह अन्य ठिकाणी जाणारी मुले (राज्यांतर्गत स्थलांतर) इतर राज्यांतून स्थलांतरित कुटुंबांसह येणारी मुले आणि शाळेच्या परिसरात वास्तव्यास असणारे तसेच शिक्षकांच्या प्रयत्नानंतरही शाळेत नियमित न येणारी मुले आदींचा समावेश आहे. स्थलांतरित कुटुंबातील शिक्षण घेत असलेल्या वयातील मुलांना त्यांच्या पालकांनी त्याच कुटुंबातील; पण स्थलांतरित न होणाऱ्या वयस्क मंडळी आजोबा, आजीसोबत राहण्यास प्रवृत्त करावे. ही व्यवस्था होऊ शकल्यास गावातील इतर कुटुंब ज्यांच्यावर संबंधित कुटुंबांचा विश्वास आहे, त्यांच्या घरी या मुलांची व्यवस्था करावी, अशी अफलातून सूचना शिक्षण विभागाने शाळांना दिली आहे.
इतर राज्यांतील मुले व पालक रोजगारासाठी विशेषत: शहरांतील बांधकामाच्या ठिकाणी पर राज्यातील कामगार अधिक प्रमाणात असतात. काही वेळा हे कामगार २ ते ३ वर्षे एकाच ठिकाणी राहतात. या कामगारांची मुले इतर राज्यांतून येत असल्याने त्यांची मातृभाषा मराठी नसते; पण या मुलांना मराठी शाळांमध्ये प्रवेश देणे आवश्यक आहे. बहुभाषिक शिक्षणाबाबत विद्या प्राधिकरणाने दिलेल्या पुस्तकांमधील दिशानिदेर्शांचा उपयोग करून मुलांना शिक्षण द्यावे. तथापि, एकाच ठिकाणी अशा मुलांची संख्या २० पेक्षा अधिक असल्यास त्यांच्यासाठी संबंधित भाषेचे जाणकार शिक्षक इतर ठिकाणी आणता येतील, असे सुचविण्यात आले. सीएसआर वा लोकसहभागातून हा खर्च भागविण्याचा सल्ला देण्यात आला. परिसरात राहूनही नियमित शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या फारच चिंताजनक आहे. या मुलांना शाळेत आणण्यासाठी शिक्षक, अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले; पण यश आले नाही. काहीवेळा शिक्षणाची गुणवत्ता योग्य नसल्याने या मुलांना शाळेत येऊनही काही फायदा झाला नाही. परिणामी, ही मुले पुन्हा शिक्षणापासून दूर गेली.
शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण पद्धत स्वीकारल्यास या समस्येवर मात करता येईल, असेही आदेशात नमूद आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने काही पर्याय शिक्षकांसमोर ठेवले आहेत. जानेवारी २०१७ पासून महिन्याच्या दर सोमवारी शाळेच्या पटावर असलेल्या मुलांमधून प्रत्येकी १० गट तयार करावे व त्यांच्या सोबत सेल्फी काढावे. या सेल्फीतील मुलांची नावे आधार क्रमांकासह सेल्फी सरलमध्ये अपलोड करावे. दुसऱ्या आठवड्यानंतर अनियमित मुलांचे सेल्फीसोबत नाव, आधार क्रमांक नोंदवावे. या पद्धतीने केवळ अनियमित मुलांसाठी काम करणे शक्य होईल व सेल्फी अपलोड करण्याचा वेळ वाचेल, असे सांगण्यात आले. या आदेशाचे पालन कसे करावे, असा प्रश्न शिक्षकांसमोर उभा ठाकला आहे. (नगर प्रतिनिधी)

गैरहजर विद्यार्थ्यांची माहिती देण्याचे आदेश
अनियमित असलेल्या विद्यार्थ्यांचे सेल्फी काढणे, त्यांचे आधार क्रमांक मागविणे आणि सरलमध्ये अपलोड करणे या प्रक्रियेतच शिक्षकांचा वेळ जाणार आहे. यासह तालुकानिहाय गैरहजर विद्यार्थ्यांच्या संख्येची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. यामुळे या आदेशांचे पालन कसे करावे, असा प्रश्न शिक्षकांसमोर उभा ठाकला आहे. शाळेतील गुणवत्ता सुधारावेत, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न करावे व हजर विद्यार्थ्यांचा सेल्फी काढावा आदी प्रश्न उपस्थित होत आहेत.

Web Title: "Selfie" with students now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.