17 ऑगस्टपासून मुलांना शाळेत पाठवायचे का? पालक संभ्रमात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 05:00 AM2021-08-09T05:00:00+5:302021-08-09T05:00:22+5:30
आपल्या पाल्यांना शाळेत पाठवल्यावर ते सुरक्षित राहतील काय? हीच मुख्य चिंता पालकांना सतावत आहे. ज्येष्ठांना किंवा १८ वर्ष वयोगटावरील नागरिकांना जसे लसीकरण करण्यात आले तसेच बालकांबाबतही लसीकरण होणार आहे काय? ते सुरक्षित कसे राहतील याची आता चर्चा होऊ लागली आहे. १७ ऑगस्टपासून इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या असल्याने हा विषय चांगलाच रंगला आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आधी आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहे आहेत. आता इयत्ता पहिली त्या सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात ऊहापोह सुरू आहे. मात्र काेरोनाची भीती कायम असून पालकगण १७ ऑगस्टपासून मुलांना शाळेत पाठवायचे का? या विचारात गुंतले आहेत.
माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यात इयत्ता पहिली ते सातवीच्या एकूण ९६५ शाळा आहेत. त्यामधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे दुसऱ्या लाटेमुळे शाळा सुरू झाल्या नव्हत्या. मात्र जिल्ह्यात कोरोना संक्रमणाची स्थिती पाहता इयत्ता आठवी ते बारावीची वर्ग सुरू करण्यात आले होते. मात्र तिथेही विद्यार्थ्यांची पटसंख्या हव्या त्या प्रमाणात दिसून येत नाही. अजूनही पालकांच्या मनात कोरोना संक्रमणाची स्थिती व भीती कायम आहे. शहरातही हवा तेवढा प्रतिसाद दिसून आलेला नाही.
आपल्या पाल्यांना शाळेत पाठवल्यावर ते सुरक्षित राहतील काय? हीच मुख्य चिंता पालकांना सतावत आहे. ज्येष्ठांना किंवा १८ वर्ष वयोगटावरील नागरिकांना जसे लसीकरण करण्यात आले तसेच बालकांबाबतही लसीकरण होणार आहे काय? ते सुरक्षित कसे राहतील याची आता चर्चा होऊ लागली आहे. १७ ऑगस्टपासून इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या असल्याने हा विषय चांगलाच रंगला आहे.
शिक्षण वर्तुळातही शाळा सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे शाळा परिसर निर्जंतुकीकरण करणे, कोविड नियमांचे पालन व अन्य बाबींवरही भर दिला जात आहे. जिल्ह्यात सातवीच्या ९६५ शाळा असल्या तरी त्यातील तीनशेच्या जवळपास शाळा सुरू होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. शाळा सुरू व्हायला अजून आठ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने त्यात वाढ होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे वर्गनिहाय विद्यार्थी संख्येवर नजर घातल्यास जिल्ह्यातील पहिली इयत्तामध्ये १६५४३ विद्यार्थी शाळेत जाणार आहेत. तसेच इयत्ता चौथी अंतर्गत १७६१७ तर पाचवीमध्ये १७२१७ विद्यार्थी शाळेत जातील मात्र यापैकी किती शाळा उघडणार ही येणारी वेळच ठरविणार आहे. पुन्हा शाळा परिसर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने गजबजणार असल्याचे दृश्य आहे.
पालकांना मुलांच्या आरोग्याची चिंता
मुलांचा पुढचा पाया मजबूत करायचा असेल तर शाळा सुरू झाल्या पाहिजेत. मात्र लहान मुलांच्या आरोग्याची काळजी शिक्षण व आरोग्य विभागाने घेतली पाहिजे. ज्याप्रमाणात १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण होत आहे, तसेच मुलांचे लसीकरण ही व्हायला हवे. यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत. याची माहिती पालकांना मिळणे अपेक्षित आहे. जेणेकरून पालकांमध्ये संभ्रम राहणार नाही. याकडे शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
-नितीन मोहारे,
पालक, कान्हळगाव (सिर.)
गत १५ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. मूल घरी गोंधळ करतात. मूलभूत शिक्षणाचा पाया कच्चा राहता कामा नये. ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षण अश्यक्य आहे. आता कोरोना कमी झाला आहे. पहिलीपासूनची शाळा सुरू करायला हरकत नसावी. पण, पालकांच्या मनात शंका राहू नये म्हणून सुरक्षेतेसाठी मुलांचे लसीकरण केले पाहिजे. समन्वय करूनच विचाराअंती शाळा सुरू कराव्यात.
-श्याम चकोले,
पालक, मोहगाव देवी