रोवणीला गेलेल्या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 12:49 AM2019-08-13T00:49:27+5:302019-08-13T00:49:50+5:30
भात रोवणीसाठी गेलेल्या महिलेचा संर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील कोंढा कोसरा येथे घडली. दुपारच्यावेळी बांधावर बसून भोजन करताना तिला विषारी सापाने दंश केला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता रविवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा (कोसरा) : भात रोवणीसाठी गेलेल्या महिलेचा संर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील कोंढा कोसरा येथे घडली. दुपारच्यावेळी बांधावर बसून भोजन करताना तिला विषारी सापाने दंश केला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता रविवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला.
गीता देवानंद लिचडे (३५) रा. कोंढा असे मृत महिलेचे नाव आहे. ती रविवारी गावातील इतर महिलांसोबत रोवणी करण्यासाठी शेतात गेली होती. दुपारी मधल्या सुट्टीत बांधावर इतर महिलांसोबत जेवण करण्यासाठी बसली होती. त्यावेळी गवतात लपून असलेल्या विषारी सापाने तिच्या डाव्या हाताला दोनदा चावा घेतला. हा प्रकार लक्षात येताच तात्काळ कोंढाच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यता आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने भंडारा येथे रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा सायंकाळी मृत्यू झाला. तिच्या मागे पती, नऊ वर्षाची मुलगी आणि पाच वर्षाचा मुलगा आहे. सोमवारी कोंढा येथे स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी प्रत्येकजण हळहळत होते.
सध्या जिल्ह्यात रोवणीचे काम सुरू आहे. मजुरांना दिवसभर चिखलात उभे राहून रोवणी करावी लागत आहे. या चिखलामध्ये आणि शेतात वाढलेल्या गवतात विषारी सापांचा संचार वाढला आहे. अनेक मजूर आपला जीव धोक्यात घालून मजुरीला जातात. विशेष म्हणजे एखाद्याला सर्पदंश झाल्यानंतर त्याला तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले जाते. परंतु त्या ठिकाणी लस उपलब्ध नसल्याने रेफर केले जाते.