गोपालकांना सेवा द्या, अन्यथा खैर नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 10:41 PM2018-01-20T22:41:34+5:302018-01-20T22:42:00+5:30
देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरी व त्यांच्या पशुधनांना पशुधन कर्मचाºयांकडून वेळीच उपचार किंवा मदत मिळत नाही.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरी व त्यांच्या पशुधनांना पशुधन कर्मचाºयांकडून वेळीच उपचार किंवा मदत मिळत नाही. जे कर्मचारी शहरात राहतात अशांनी मुख्यालयातच निवासी राहून ग्रामीणांना सेवा द्यावी, अन्यथा त्यांची खैर नाही, असा गर्भित इशारा राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी पशुधन अधिकारी व कर्मचाºयांना दिला.
भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघ व राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड यांच्या विद्यमाने येथील एका सभागृहात आयोजित संतुलीत पशुआहार जनजागृती व दुग्ध उत्पादक शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अॅड. रामचंद्र अवसरे हे होते. यावेळी ना.जानकर म्हणाले, राज्यात जलयुक्त शिवार योजनेप्रमाणे चारायुक्त शिवार ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. जनावरांना संतुलित आहार दिल्यास दूध उत्पादन वाढण्यास मदत होईल. शासन आदेशाची भंडारा दुग्ध संघाने अंमलबजावणी केली असून या संघाचे कार्य राज्यात अव्वल आहे. त्यामुळे भंडाºयात ‘फिडमिल’ देण्याची घोषणा त्यांनी केली.
राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचा संतुलीत पशु आहार कार्यक्रमानुसार गावपातळीवर १५६ एलआरपींची निवड करण्यात आली आहे. या प्रतिनिधींना लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. यावेळी सुनिल फुंडे यांनी भौगोलिक परिस्थितीवर मात करून दुग्ध व्यवसायिकांनी जिल्ह्यात धवलक्रांती करून राज्यात अग्र क्रमांक पटकाविण्यासाठी सहकार्य करावे. दुध वितरण प्रणाली अधिक सक्षम करण्याची मागणी फुंडे यांनी केली.
यावेळी दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे व्यवस्थापक डॉ. चंद्रशेखर डाखोळे, राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भप्रमुख अॅड. मनोज साबळे, माजी नगराध्यक्ष पटेल, विनायक बुरडे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुरेश कुंभरे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नितीन फुके उपस्थित होते. संचालन व आभार कार्यकारी संचालक करण रामटेके यांनी केले.
भंडारा संघ अव्वल
दुग्ध व्यवसाय विकास मंत्री म्हणून दूध उत्पादक शेतकºयांना २७ रूपये लिटर दुधाला भाव देण्याचे आदेश बजावण्यात आले होते. मात्र राज्यातील भंडारा दुग्ध संघाने या आदेशाचे अंमलबजावणी केली आहे. या अंमलबजावणीमुळे भंडारा जिल्ह्यातील दुध उत्पादकांना २७ रूपये दुधाचा दर देण्यात येत आहे. यामुळे दुध संघ आर्थिक अडचणीत आला असला तरी त्यांनी शेतकºयांच्या हिताचा निर्णय घेऊन कार्य केले असल्याने हा संघ राज्यात अव्वल असल्याची माहिती रामलाल चौधरी यांनी दिली.
आरे एकमेव ब्रॅन्ड ठरावा
दुधाच्या बाबतीत राज्यात 'आरे' हा एकमेव ब्रॅन्ड ठरावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ७०:३० चा कायदा लवकरच अस्तित्वात आणण्याचा विचार असून भारताचा विकास दर दुधाच्या व्यवसायामुळे वाढला असून दुग्धजन्य पदार्थावरील वस्तू व सेवाकर ७० टक्यांवरून पाच टक्के करण्यात आले. पारंपरिक शेतीसह दुग्ध व्यवसाय वाढविण्यासाठी पशुधन सवलतीवर वाटपाची योजना अस्तित्वात आणण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. गोसंवर्धनासाठी सध्या प्रत्येक जिल्ह्याला एक कोटी रूपये दिले असून भविष्यात चांगले काम झाल्यास प्रत्येक तालुक्याला एक कोटी रूपये देण्याची घोषणा त्यांनी केली.
फिरता पशुवैद्यकीय दवाखाना
ग्रामीण पशुपालकांना पशुधनांच्या आरोग्याबाबत अडचणी निर्माण होत आहे. यामुळे येत्या काही दिवसात राज्यात फिरता पशुवैद्यकीय दवाखान्याची संकल्पना राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून मोबाईलवर पशुपालकाला एक मॅसेज द्यायचा आहे. मॅसेज मिळताच फिरत्या पथकाचे पशुधन कर्मचारी पशुपालकांना सेवा देण्यासाठी पोहचतील अशी सुविधा निर्माण करायची आहे.