गोरगरीब रूग्णांची सेवा व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 10:24 PM2017-08-14T22:24:54+5:302017-08-14T22:25:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव कमी झाला असून या क्षेत्राचे आता व्यापारीकरण होऊ लागले आहे. रूग्णांची सेवा करणे हा धर्म राहिला नाही. परंतु, सर्वच रूग्णालयात असे प्रकार होत नाहीत. पेस हॉस्पीटल अॅण्ड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून रूग्णांची सेवा केली जावी, त्यांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केली.
भोंडेकर शिक्षण संस्थाद्वारा संचालित पेस हॉस्पीटल अॅण्ड रिसर्च सेंटरच्या नवीन रूग्णालयाचा पायाभरणी समारंभ आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने होते. अतिथी म्हणून माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले, अॅड. वसंत एंचिलवार, सीएमडी डॉ.अश्विनी भोंडेकर, संजय रेहपाडे, डॉ.जगदीश निर्वाण, पायल मेश्राम उपस्थित होते.
पुजा नर्सिंग कॉलेज परिसरात १५० बेडच्या नवीन मल्टीस्पेशालिटी रूग्णालयाची पायाभरणी करण्यात आली. या रूग्णालयात लागू करण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. संस्थेच्यावतीने खा.पटोले, खा. तुमाने, सुनिल मेंढे यांना शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविक पेस हॉस्पीटलच्या सीएमडी डॉ. अश्विनी भोंडेकर यांनी केले. खा. कृपाल तुमाने, सुनिल मेंढे, राजेंद्र पटले यांनी मार्गदर्शन केले. माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी रूग्णांना सुविधा मिळणार असल्याची ग्वाही दिली.
संचालन पायल भगत, मनिषा कुरंजेकर यांनी केले. आभार प्रा. मनोज बागडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा.चोहले, चवळे, प्रा.शिंदे, प्रा.रत्नमाला मुनेश्वर, प्रा.कटकवार, किरण निमजे, कृष्णा ठोसरे, आतिष भिलकर, तांडेकर, राजेश मेश्राम, विनोद दोनाडकर, विश्वनाथ ठाकरे तसेच प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.