कर्करोगग्रस्तांना मिळणार तत्पर सेवा
By admin | Published: September 17, 2015 12:35 AM2015-09-17T00:35:15+5:302015-09-17T00:35:15+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालय सामान्य जनतेला आरोग्याच्या सर्व अत्याधुनिक सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
कर्करोग सेवेचा शुभारंभ : रामचंद्र्र अवसरे यांचे प्रतिपादन
भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालय सामान्य जनतेला आरोग्याच्या सर्व अत्याधुनिक सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील आहे. यात आणखी एक पाऊल पुढे टाकत रुग्णालयाने कर्करोगाचे निदान व उपचार सेवेचा शुभारंभ करुन कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे, असे प्रतिपादन आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले.
जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्करोग कक्ष व उपचार सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनीता बडे, असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे अधिकारी रा.वा. कांबळे , जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे उपस्थित होते. यावेळी कर्करोग कक्षाचे उदघाटन अॅड. अवसरे यांनी केले. आ. अवसरे म्हणाले, कर्करोगाचे रुग्णांवर रुग्णालयात पूर्वीही उपचार होत असत. मात्र त्यासाठी आता नागपूर येथील दोन कर्करोग तज्ञांच्या सेवा येथे उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याचा फायदा जिल्ह्यातील जनतेने करुन घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र्र पातुरकर यांनी यासाठी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी डॉ. पातुरकर म्हणाले, आपल्याकडे कर्करोगाचे निदान लवकर होत नाही. कारण त्यासाठीची जागृती लोकांमध्ये नाही. त्यामुळे अगदी शेवटच्या स्टेजमध्ये गेल्यानंतरच रुग्णांना या आजाराची माहिती होते. त्यामुळे अनेक कर्करोग झालेल्या रुग्णांचा मृत्यू होतो. सामान्य रुग्णालयात नागपूर येथील कर्करोगतज्ज्ञ डॉ.अमित जयस्वाल यांची दर महिन्याच्या १६ तारखेला व डॉ. अभिषेक वैद्य यांची दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी सेवा उपलब्ध होणार आहे.
तेव्हा नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. निदान, उपचार व मार्गदर्शन यासाठी हे दोन तज्ज्ञ उपलब्ध असणार आहेत. संचालन प्राजक्ता पेठे यांनी केले. प्रास्ताविक असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे अधिकारी रा.वा. कांबळे यांनी केले. (नगर प्रतिनिधी)