प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवा वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:47 AM2021-02-27T04:47:16+5:302021-02-27T04:47:16+5:30
लाखनी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या परिसरात दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांची संख्या अधिक आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे समाजातील शेवटच्या घटकाला आरोग्य ...
लाखनी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या परिसरात दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांची संख्या अधिक आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे समाजातील शेवटच्या घटकाला आरोग्य सेवा मिळत नाही.
मुरमाडी(तुप.) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात २ आयुर्वेदिक दवाखाने, ६ उपकेंद्रे आणि २९ गावे आहेत. जवळपास ३० हजार लोकसंख्येला आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी या केंद्रांवर आहे. रिक्त पदांमुळे योग्य सेवा मिळत नाही. या प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकारी व कर्मचाऱ्यांची ३६ पदे मंजूर आहेत. सध्या येथे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य साहाय्यिका, आरोग्य सेविका, वाहन चालक, परिचर, सफाई कामगार आणि अंशकालीन महिला परिचर अशी १४ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. इच्छा असूनही आरोग्य सेवा देता येत नसल्याचे दिसून येते.
मुरमाडी (तुप.) प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत निम्मी गावे चुलबंद नदी काठावर आहेत. त्यामुळे पावसाळ्यात जलजन्य आजार बळावतात. या परिसरातून लाखांदूर व पवनी तालुक्यात जोडणारा इतर जिल्हा मार्ग गेल्याने अपघातांचे प्रमाण अधिक आहे. तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी होणाऱ्यांची संख्याही बरीच आहे. पण, या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचाराचीच सोय असल्याने पुढील उपचारासाठी लाखनी किंवा साकोलीला जावे लागते. त्यामुळे रुग्ण दगावण्याचा धोका असल्याने या प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देणे गरजेचे झाले आहे.
बॉक्स
उपकेंद्राची परिस्थिती गंभीर
मुरमाडी (तुप.) प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ६ उपकेंद्रे येतात. पालांदूर, खराशी, मरेगाव, कोलारी व लहान दिघोरी येथील आरोग्य सेविकेचे पद रिक्त आहे. त्यामुळे स्तनदा व गरोदर माता तसेच अंगणवाडीतील तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो.