तीळ किलोमागे ६० रुपयांनी महाग, सर्वसामान्यांना दरवाढीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 05:16 PM2021-12-21T17:16:40+5:302021-12-21T17:21:19+5:30
यंदाच्या संक्रांतीनिमित्त गुळासोबत तिळाचे वाढते दर सर्वसामान्यांच्या खिशाला फटका देणारे ठरणार आहेत. चालू वर्षात १०० रुपये किलो असलेला तिळाचा दर आता १६० रुपयांवर गेला आहे.
भंडारा : थंडीची चाहूल लागली की आठवण होते ती संक्रांतीची. विशेष करून महिलांना संक्रांती सणाचे वेध लागतात; मात्र तीळ महागल्याने अनेक महिला आतापासूनच खरेदी करून ठेवत आहेत. 'तिळगूळ घ्या, गोडगोड़ बोला, असे म्हणत सर्वजण मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करतात. यंदाच्या संक्रांतीनिमित्त गुळासोबत तिळाचे वाढते दर सर्वसामान्यांच्या खिशाला फटका देणारे ठरणार आहेत.
हिवाळ्यात अनेकजण तीळ खाण्याला पसंती देतात. मकर संक्रांतीदिवशी एकमेकांना तिळगुळाचे वाटप केले जाते. महिला हळदी-कुंकू कार्यक्रमांचे आयोजन करतात. चालू वर्षात १०० रुपये किलो असलेला तिळाचा दर आता १६० रुपयांवर गेला आहे.
जिल्ह्यात तिळाचे पीक झाले नामशेष...
गोसेच्या पूर्वी जिल्ह्यात तिळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत होते. मात्र आता जिल्ह्यातून तीळ पीक हद्दपार झाले आहे. काही प्रमाणात करडई, जवस, तिळाची पेरणी झाली आहे. मात्र अनेकांना किराणा दुकानांतूनच विकत घ्यावे लागतात.
तीळ आयात होतो कोठून?
जिल्ह्यात तिळाचा पेरा घटला आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठेत राज्याच्या विविध भागांसह उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटकसह विविध राज्यांमधूनही महाराष्ट्रात तिळाची आयात मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. यासोबतच मराठवाड्यातही मोठे तिळाचे उत्पादन घेतले जाते.
...म्हणून वाढले तिळाचे दर
तिळाचे उत्पादन जिल्ह्यातच नव्हे, तर राज्याच्या विविध भागांत घटले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळेही तीळ उत्पादन कमी झाले आहे. मात्र तिळाला संक्रांतीमुळे मागणी वाढत आहे. त्यामुळे दर वाढले आहेत. त्यातही काळ्या तिळाचे दर सर्वाधिक आहेत.
संक्रांतीचे तीळ आत्ताच घेऊन ठेवा...
सध्या तिळाचे दर हे तब्बल १६० रुपये किलोवर गेले आहेत. त्यात मकर संक्रांतीचा सण जवळ आल्याने अनेकजण तीळ खरेदी करत आहेत. त्यामुळे आतापासूनच महिला तीळ खरेदी करत आहेत.
मागणीच्या तुलनेत उत्पादन कमीच...
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर होणारी दरवाढ पाहता, अनेकांनी आताच तिळाची खरेदी सुरू केली आहे. यामुळे तिळाचे दरच नव्हे, तर सर्वत्र महागाई वाढली आहे. काळ्या तिळासह तेलाचे दरही वाढले आहेत.