पीक कर्जासाठी ग्रामस्तरावर यंत्रणा उभी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 09:39 PM2018-07-20T21:39:13+5:302018-07-20T21:39:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात राष्ट्रीयकृत तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत केवल ४७.१२ टक्के खरीप पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. बँकेमार्फत शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करतांना अडचणी येत आहेत. यावर मात करण्यासाठी जिल्ह्यात ग्रामपातळीवर महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांची यंत्रणा उभी करून शेतकऱ्यांचे खरीप पीक कजार्चे अर्ज बँकेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करण्याच्या सूचना सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस. एस. संधू यांनी दिल्या.
नागपूर येथे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात आज भंडारा जिल्हा खरीप पीक कर्ज वाटप आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपस्थित बँक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी आमदार चरण वाघमारे, राजेश काशीवार, रामचंद्र अवसरे, सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे, विभागीय आयुक्त अनूप कुमार, विभागीय सह निबंधक प्रवीण वानखडे, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर यांच्यासह राष्ट्रीयकृत तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बँकेचे प्रतिनिधी ग्रामपातळी ऐवजी तालुकास्तरावर कार्यरत असल्याने गावातील पीक कर्जास पात्र शेतकऱ्यांपर्यंत बँकेची यंत्रणा पोहोचत नसल्याच्या अनेक तक्रारी ऐकावयास मिळत आहे. शेतकरी बँकेत कजार्साठी आल्यास त्यांना बँकेमार्फत योग्य ती माहिती दिली जात नाही, त्यामुळे बँक अधिकाऱ्यांशी असभ्य वर्तणुकीच्या घटना समोर येत आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी बँकेच्या प्रत्येक शाखेने गाव पातळीवर शिबिरांचे आयोजन करावे. बँक प्रतिनिधींनी शिबिरामार्फत गावातील पात्र शेतक?्यांची कर्जमाफी करून त्यांना पीक कर्ज उपलब्ध करून दिले आहे किंवा नाही याची गावातील तलाठी तसेच संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी खात्री करून त्यासंबंधीचा अहवाल तहसीलदारांना सादर करावा, अशा सूचना एस. एस. संधू यांनी दिल्या.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कार्यरत कंपनी प्रतिनिधींनी शेतक?्यांना विम्याचा लाभ देतांना संकलीत केलेली माहिती जिल्हाधिकारी यांना सादर करावी. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पीक विमा कंपन्यांचे कार्यालय स्थापन करावे. कृषी विभागाने स्थापित कार्यालयाची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी जनजागृती मोहिम राबवावी. जनजागृती तसेच ग्रामस्तरावरील चमूच्या मदतीने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज योजनेचा लाभ मिळेल, अशी यंत्रणा उभी करण्यास त्यांनी यावेळी सांगितले.
विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत वर्धा जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या मायक्रो एटीएम सेवा भंडारा जिल्ह्यात सुरु करून शेतकऱ्यांना या योजनेशी जोडण्याचे आवाहन केले. सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे यांनी प्रारंभी बँक अधिकारी तसेच उपस्थित लोकप्रतिनिधींशी संवाद साधून खरीप पीक कर्ज वाटपात येणाºया अडचणीची माहिती घेतली.