आरोग्य विभागाच्या परीक्षेत प्रश्नपत्रिकेचे संच फुटलेले आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 10:29 AM2021-11-01T10:29:55+5:302021-11-01T11:14:23+5:30
मोहाडी येथील सुदामा विद्यालयातील खोली क्रमांक १२ मध्ये प्रश्नप्रत्रिकेचे संच येताच त्यातील दोन संच आधीच फुटले असल्याचे दिसून आले. तर, राजुरा येथेही जिल्हा परिषद विद्यालयाच्या केंद्रात पेपरचा दस्ता फुटला असल्याचे आढळून आल्याने दोन्ही ठिकाणी गोंधळ उडाला होता.
मोहाडी (भंडारा) / राजुरा (चंद्रपूर) : आरोग्य विभागांतर्गत रविवारी घेण्यात आलेल्या ग्रुप डीच्या परीक्षेत मोहाडी येथील सुदामा विद्यालय या परीक्षा केंद्रावर खोली क्र. १२ मध्ये प्रश्नपत्रिकेचे दोन संच फुटलेले आढळले. तर राजुरा येथील केंद्रावरही पेपरचा दस्ता फाटलेला आढळला. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी हरकत घेतल्याने जवळपास ४५ मिनिटे गोंधळ उडाला होता. या प्रकाराने आरोग्य विभागाचा भाेंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
आरोग्य विभागांतर्गत ग्रुप डीसाठी रविवारी ठिकठिकाणी केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. यात मोहाडी येथील सुदामा विद्यालयातील खोली क्रमांक १२ मध्ये प्रश्नप्रत्रिकेचे संच येताच त्यातील दोन संच आधीच फुटले असल्याचे दिसून आले. यावरून विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नांची संबंधितांना समाधानकारक उत्तर देता न आल्याने १४ विद्यार्थी खोलीबाहेर निघून गेले.
याप्रकरणी जिल्हाधिकारी संदीप कदम व जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी परीक्षा केंद्राला भेट दिली. प्रश्नपत्रिका सीलबंद पेटीमधून बाहेर काढतानाचे व्हिडीओ फुटेज बघितले आहे, यावर शासन काय तो निर्णय घेईल, असे यावेळी सांगण्यात आले. आता ही परीक्षा रद्द होते की काय, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
परीक्षेची संपूर्ण जबाबदारी ‘नासा’ एजन्सीतर्फे राबविण्यात आली होती. यात एजन्सीचे काय म्हणणे आहे, ते महत्त्वाचे आहे.
- डॉ. रियाज फारूकी, जिल्हा शल्यचिकित्सक, भंडारा.
राजुरा केंद्रावरील प्रकार ४५ मिनिटे विलंबाने झाली परीक्षा
राजुरा येथे दोन सेंटरवर ही परीक्षा घेण्यात आली. यासाठी बाहेरील जिल्ह्यातून अनेक युवक राजुरा येथे आले होते. दरम्यान, परीक्षा सुरू होण्यापूर्वीच जिल्हा परिषद विद्यालयाच्या केंद्रात पेपरचा दस्ता फुटला असल्याचे परीक्षार्थ्यांच्या लक्षात आले. यावर अनेक परीक्षार्थ्यांनी आक्षेप घेतला. यामुळे जिल्हा परिषद विद्यालयातील केंद्रावर ४५ मिनिटे गोंधळ उडाला. त्यानंतर विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी देण्यात आला. या प्रकारामुळे पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी समज दिल्यानंतर परीक्षा सुरळीत पार पडली.