तुमसर तालुक्यातील ४५ गावांत पाण्याचा ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:08 PM2019-04-29T22:08:35+5:302019-04-29T22:08:58+5:30
तालुक्यात बहुतांश विहिरी, तलाव, बोळ्या यांनी तळ गाठला असून अनेक जलस्त्रोत कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. आदिवासी बहुल ४५ गावांत पाण्याचा ठणठणाट आहे. उन्हाळी धान पीक धोक्यात आले आहे. नदी, नाले कोरड्या पडल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यात बहुतांश विहिरी, तलाव, बोळ्या यांनी तळ गाठला असून अनेक जलस्त्रोत कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. आदिवासी बहुल ४५ गावांत पाण्याचा ठणठणाट आहे. उन्हाळी धान पीक धोक्यात आले आहे. नदी, नाले कोरड्या पडल्या आहेत. अनेक गावात पाण्याकरिता वनवन भटकावे लागत आहे. बावनथडी धरण व कवलेवाडा बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग करण्याकरिता जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. मध्यप्रदेशातील पठार संघर्ष समितीने यापूर्वीच बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्याकरिता एल्गार केला आहे.
तुमसर तालुका धान उत्पादक तालुका असुन यावर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पीक शेतकऱ्यांनी लावला आहे. सध्या सूर्य आग ओकत असून विहिरी, तलावांनी तळ गाठला आहे. अनेक मोठी तलाव कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. कारली, बघेडा हे मोठे तलाव कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. चिचोली जवळील तलाव पूर्ण कोरडा पडला असून त्याचे रुपांतर मैदानात झाले आहे. चांदपूर तलावातही पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असल्याचे समजते.
कडक उन्हामुळे झपाट्याने पाण्याचे बाष्पीभवन होते. नदी, तलाव, कोरडे पडल्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत. सध्या एप्रिल महिन्याच सुरु आहे. मे महिन्यात पाण्याकरिता टँकर लावण्याची गरज प्रशासनाला करावी लागण्याची अधिक शक्यता आहे. मानवासोबतच वन्यप्राण्यांची पाण्याकरिता भटकंती सुरु आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटी पाणी समस्या निर्माण झाल्याने प्रशासन खळबळून जागे झाले आहे. पाणीटंचाई व तीव्र पाणी टंचाईची गावे याची माहिती गोळा करणे सध्या सुरु आहे.
बावनथडी धरणात उपलब्ध पाणी साठा २२.८५ टक्के असून धरणात पाण्याची पातळी ३३७ मीटर आहे. २१७ दलघमी इतका पाणी साठा उपलब्ध आहे. मृतसाठा १०.५१ टक्के आहे. कवलेवाडा बॅरेजमधून वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी पं.स. सदस्य हिरालाल नागपूरे यांनी केली आहे. कवलेवाडा बॅरेजमध्ये पाणीसाठा उपलबध आहे.
बावनथडी धरणातून कारली जलाशयात पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी युवा नेते डॉ. पंकज कारेमोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. आदिवासी बहुल गावात पाण्याकरिता भटकंती सुरु असून या गावात सर्व्हे करुन टंचाईग्रस्त गावांची यादी व आराखडा तयार करुन टँकरने पाणीपूरवठा करण्याची मागणीही डॉ. पंकज कारेमोरे यांनी केली आहे.
बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्याकरिता कटंगी, वारासिवनी येथील पठार संघर्ष समितीने एल्गार सुरु केला आहे. बावनथडी व कवलेवाडा बॅरेजमधून पाणी विसर्ग न केल्यास आंदोलनाचा इशारा पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपूरे, डॉ. पंकज कारेमोरे यांनी दिला आहे.
बावनथडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. १० दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे.
- क्षितीश मानवटकर,
कार्यकारी अभियंता, भंडारा