सामूहिक विवाह सोहळ्यात सात जोडपी विवाहबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 10:08 PM2019-04-21T22:08:09+5:302019-04-21T22:08:37+5:30
हनुमान जयंती उत्सव समिती बेलघाटा वॉर्ड तर्फे हनुमान जयंती सोहळा व गोपालकाला निमित्त शनिवारला संताजी मंगल कार्यालय येथे सर्वधर्मीय शेतकरी कन्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामूहिक विवाहात सात जोडपी विवाहबद्ध झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : हनुमान जयंती उत्सव समिती बेलघाटा वॉर्ड तर्फे हनुमान जयंती सोहळा व गोपालकाला निमित्त शनिवारला संताजी मंगल कार्यालय येथे सर्वधर्मीय शेतकरी कन्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामूहिक विवाहात सात जोडपी विवाहबद्ध झाली. यात दोन बौद्ध समाजाच्या जोडप्यांचा समावेश आहे.
सोहळ्याचे उद्घाटन आमदार रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी अड्याळ टेकडीचे सुबोध दादा होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हा परिषद माजी सभापती विकास राऊत, पंचायत समिती सदस्य तोमेश्वर पंचभाई, नगरसेवक नरेश तलमले, प्रियंका जुमडे, किशोर पंचभाई, पप्पू रेवतकर, अॅड. लक्ष्मण देशमुख आदी उपस्थित होते.
सायंकाळी सहा वाजता मंगलाष्टकाने विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर बौद्ध पद्धतीने दोन जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडला. या प्रसंगी मान्यवरांनी वर-वधूंना शुभाशीर्वादपर मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक राजेश तलमले, संचालन ज्ञानेश्वर वाघमारे व आभार प्रदर्शन धनराज जुमडे यांनी केले. कार्यक्रमाकरिता हनुमान मंदिर पंचकमेटी, माता मंदिर पंच कमेटी, टायगर ग्रुप, बाल बजरंग भजन मंडळ, छावा संग्राम परिषद आदींनी विशेष परिश्रम घेतले. या विवाह सोहळ्यासाठी जिल्ह्यासह परजिल्ह्यातील हजारो वऱ्हाडी उपस्थित होते. विवाहानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
जोडप्यांना साहित्य वितरित
पवनी येथील संताजी मंगल कार्यालयात पार पडलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यातील सात जोडप्यांना हनुमान जयंती उत्सव समितीच्या वतीने संसारोपयोगी साहित्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित हजारो वºहाड्यांनी वरवधूंना शुभाशीर्वाद देऊन त्यांना भावी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.