सात लाखांची देशी दारु जप्त
By admin | Published: October 7, 2016 12:41 AM2016-10-07T00:41:37+5:302016-10-07T00:47:33+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी दारू, अवैध देशी, विदेशी दारूविरोधात केलेल्या कारवाईत
उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : दोन पीकअप वाहने जप्त
भंडारा : राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी दारू, अवैध देशी, विदेशी दारूविरोधात केलेल्या कारवाईत ७ लाख २० हजार रूपयांच्या ९० मिलीच्या बाटलांच्या ३०० पेट्या जप्त केल्या. याप्रकरणी आरोपी वाहन चालकमालक शाबीर अली सय्यद, आनंद रामदास उमरीकर व सय्यद अजरुद्दीन यांच्याकडून १० लाख ७५ हजार किमतीच्या २ महेंद्र बोलेरो, ११ हजार किमतीचे तीन मोबाईल असे १८ लाख ६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी या तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत कलम ६५ ए (ई) व ८१, ८३ अन्वये गुन्हा नोंदविला असून ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक सुरेंद्र मनपिया यांनी केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे पवनी तालुक्यातील खैरी दिवान गावाच्या चौरस्त्यावर लाखांदूर ते पवनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अवैध देशी दारूचा साठा वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच निरीक्षक एस.एम. राऊत, दुय्यम निरीक्षक आर.आर. उरकुडे यांनी चमूसह खैरी दिवान येथे पाळत ठेऊन वाहनांची तपासणी केली. यात एम.एच. ३६/एफ ३१२५ व एम.एच. ३६ / एफ ३४९६ या दोन पिकअप वाहनाना थांबविण्यात आले. या वाहनात देशी दारूचा अवैध साठा सापडल्यामुळे वाहनासह मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राथमिक तपासात देशी दारूचा साठा चंद्रपूर जिल्ह्यात जात असल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
जिल्ह्यातून हातभट्टी दारू, अवैध देशी, विदेशी दारू व परराज्यातून या जिल्ह्यात येणाऱ्या अवैध दारूचे उच्चाटन करण्याकरिता या विभागाने धाडसत्र सुरू केले आहे. त्यामुळे आपल्या परिसरात अवैध दारूबाबत काही गुन्हा घडत असेल तर त्यांनी याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे करण्याचे सांगून माहिती देणाऱ्यांचे नाव गोपणीय ठेवण्यात येईल, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सुरेंद्र मनपिया यांनी केले.
या कारवाईत निरीक्षक एम.एम. राऊत, आर.आर. उरकुडे व जवान एस.डब्लू. कोवे, जी.एस. सिंदपुरे, व्ही.एन. हरिणखेडे, व्ही.जे. माटे सहभागी होते. (नगर प्रतिनिधी)