दुसऱ्या दिवशी सात नामांकन दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 05:00 AM2021-12-03T05:00:00+5:302021-12-03T05:00:45+5:30
निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षाने अद्याप अधिकृत उमेदवारांची घोषणा केली नाही. त्यामुळे सर्वच जण उमेदवारीच्या घोषणेची प्रतीक्षा करीत आहेत. अंतिम दिनांक सोमवार ६ डिसेंबर असल्याने येत्या दोन दिवसात उमेदवारांची घोषणा होईल आणि त्यानंतर नामांकन दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी राजकीय पक्षांची वेट अँड वाॅचची भूमिका आहे. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन भरायचे आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या नामांकनासाठी गुरुवारी दुसऱ्या दिवशी सात नामांकन दाखल झाले. त्यात जिल्हा परिषदेसाठी चार तर पंचायत समितीसाठी तीन नामांकनाचा समावेश आहे. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी एकही नामांकन दाखल झाले नव्हते. नामांकनाच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरणाऱ्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे.
भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. १ डिसेंबर पासून नामांकनाला प्रारंभ झाला असून नामांकन दाखल करण्याचा अंतिम दिनांक ६ डिसेंबर आहे. दुसऱ्या दिवशी भंडारा तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी खमारी आणि धारगाव गटातून प्रत्येकी एक असे दोन अर्ज दाखल झाले तर मोहाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेसाठी पाचगाव आणि करडी तर पंचायत समितीसाठी खमारी बुज., पाचगाव आणि मोहगाव (देवी) येथे प्रत्येकी एक असे पाच अर्ज दाखल झाले आहेत. तुमसर, साकोली, लाखनी, पवनी आणि लाखांदूरमध्ये दुसऱ्या दिवशी एकही नामांकन दाखल झाले नाही.
निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षाने अद्याप अधिकृत उमेदवारांची घोषणा केली नाही. त्यामुळे सर्वच जण उमेदवारीच्या घोषणेची प्रतीक्षा करीत आहेत. अंतिम दिनांक सोमवार ६ डिसेंबर असल्याने येत्या दोन दिवसात उमेदवारांची घोषणा होईल आणि त्यानंतर नामांकन दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे.
अर्ज दाखल करण्यासाठी राजकीय पक्षांची वेट अँड वाॅचची भूमिका आहे. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन भरायचे आहे. त्यातच उमेदवार अद्याप जाहीर झाले नाही. काही पक्षांचे मुलाखतीचे सत्र सुरु आहे. त्यामुळे अखेरच्या दोन दिवसात उमेदवारांची घोषणा होऊन नामांकन दाखल होण्याची शक्यता आहे. तुर्तास तरी सर्वांची वेट अँड वाॅचची भूमिका आहे. सर्वांच्या नजरा आता कुणाला उमेदवारी मिळते याकडे लागले आहे.
नगरपंचायतीत दुसऱ्या दिवशीही नामांकन नाही
- जिल्ह्यातील मोहाडी, लाखनी आणि लाखांदूर या तीन नगरपंचायतीची निवडणूक होत आहे. नामांकनाला १ डिसेंबरपासून प्रारंभ झाला. परंतु दुसऱ्या दिवशीही एकही नामांकन जिल्ह्यात दाखल झाले नाही. नामांकन दाखल करण्याची अंतिम तिथी ७ डिसेंबर असल्याने शेवटच्या दोन दिवसात येथेही गर्दी होणार आहे.
बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या टप्प्यात घोषणा
- जागा एक आणि दावेदार अनेक अशी स्थिती जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आहे. त्यामुळे तिकीट न मिळालेले बंडखोरी करण्याची शक्यता आहे. ही बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या टप्प्यात उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे.