लाखांदूर तालुक्यातील सात गावे प्रतिबंधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:34 AM2021-04-18T04:34:56+5:302021-04-18T04:34:56+5:30
गत काही दिवसांपासून तालुक्यात नियमित कोविड चाचणीदरम्यान कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. सदर रुग्ण आढळून येत असताना ...
गत काही दिवसांपासून तालुक्यात नियमित कोविड चाचणीदरम्यान कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. सदर रुग्ण आढळून येत असताना काही रुग्णांचा कोरोना आजारामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचीदेखील माहिती आहे. दरम्यान, तालुक्यात मोठ्या प्रमाणातील कोरोनाबाधित रुग्ण ग्रामीण भागात आढळून आल्याने तालुका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाच्या पुढाकारात तालुक्यातील सात गावे प्रतिबंधित केली आहेत. या गावांमध्ये पालेपेंढरी, हरदोली, विरली(बू.), मडेघाट, कुडेगाव, मांदेड व चिचगाव आदी गावांचा समावेश आहे.
सदर गावांत कोविड चाचणीदरम्यान अधिकतम बाधित रुग्ण आढळून आल्याने सदर गावे प्रतिबंधित करण्यात आली आहेत. या गावांच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून, गावकऱ्यांना बाहेर ये-जा करण्यासह अन्य गावांतील नागरिकांनादेखील गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तथापि, शासन निर्देशाचे पालन होण्यासाठी तालुक्यात दुसऱ्या वीकेंड लॉकडाऊनअंतर्गत सर्वत्र पोलिसांनी चोख नाकाबंदी केली आहे.
तालुक्यात संचारबंदी व जमावबंदी नियमाचे उल्लंघन टाळण्यासाठी पोलिसांनी जनतेला आवाहन करीत सर्वत्र कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार तालुक्यातील प्रत्येक गावात हॉटेल, दुकाने आस्थापना, प्रतिष्ठाने यासह अन्य दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. केवळ औषधी दुकाने, दवाखाने, किराणा दुकाने व भाजीपाला यासह काही अत्यावश्यक गरजेची दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत.
बॉक्स :
अंत्यसंस्कारासाठी जागा निश्चित
दिवसेंदिवस तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असताना काहींचा उपचारादरम्यान मृत्यूदेखील होत आहे. मृत रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी स्मशानभूमी निश्चित करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील रुग्णालयात बेडची अपुरी व्यवस्था व मृत रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता तालुक्यातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास सबंधितांच्या अंत्यसंस्कारासाठी तालुक्यातच स्मशानभूमीची जागा निश्चित करण्यात आल्याच्या चर्चेने सर्वत्र भीती व्यक्त केली जात आहे.