१५ गावात पाण्याची भीषण टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:57 AM2021-05-05T04:57:32+5:302021-05-05T04:57:32+5:30
बावनथडी प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडा : उन्हाळी पीके मरणासन्न अवस्थेत राहुल भुतांगे तुमसर : उन्हाची दाहकता वाढल्याने जलस्तर ...
बावनथडी प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडा
: उन्हाळी पीके मरणासन्न अवस्थेत
राहुल भुतांगे
तुमसर : उन्हाची दाहकता वाढल्याने जलस्तर खोलात गेला आहे. तालुक्यातील विहिरी, तलाव पूर्णतः आटले व बोरवेल सुद्धा बंद पडल्याने विशेषतः नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर तर आला आहेच त्याच बरोबर शेतकऱ्यांची उन्हाळी पीके मरणासन्न अवस्थेत आली आहेत. परिणामी तत्काळ प्रभावाने बावनथडी प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांनी व नागरिकांनी केली आहे.
तुमसर मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारे अशी ओळख निर्माण झालेल्या राजीव गांधी (बावनथडी) प्रकल्प हा बवनथडी नदीवर उभारण्यात आला त्यामुळे मध्यप्रदेशातून नदीवाटे येणारा पाणी राजीव गांधी प्रकल्पातच अडविले जात आहे परिणामी बावनथडी नदीत पाण्याचा ठणठणात आहे. त्यामुळे तालुक्यातील देवनारा, चिखली, डोंगरी बुज., रोहणीटोला, चांदमारा, लोभी, आष्टी, बावनथडी, पाथरी, कवलेवाडा, सकरघरा, घानोड, सोंड्या वारपिंडकेपार, महालगाव या गावामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. निसर्गावर अवलंबून असलेल्या साधन सामुग्रीचा वापर करून येथील शेतकरी आपल्या शेतात हंगामी पिकांचे उत्पादन घेतात. मात्र गत पावसाळ्यात पडलेला अत्यल्प पाऊस व उन्हाच्या वाढत्या दाहकतेमुळे विहिरी तलाव तळ गाठत आहे
त्यावर शेती फिडरच्या भारनियमन मुळे शेतकऱ्यांचा उभ्या पिकांना फटका बसला आहे आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांनी परत कर्जबाजारी होऊन नव्या उमेद ने उन्हाळी हंगामात ऊस व धान पिक शेतात लावले परंतु विहारी तलाव बोअरवेल आटल्याने त्या उभ्या पिकांना कसे वाचविता येईल या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. बावनथडी प्रकल्पात पाण्याचा मुबलक साठा आहे त्या पाण्याचा नदीपात्रात निचरा झाल्यास जलस्तर वाढून विहिरी ना पाणी येईल व पिकांना जीवनदान मिळेल मात्र शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या प्रकल्पातून पाणी शेतकऱ्यांना मिळत नसेल व पाण्याअभावी शेतकऱ्यांचे उभे पीक मरत असतील तर त्या प्रकल्पाचा फायदा तरी काय असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे लोक प्रतिनिधीने याकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे.
कोट
आतापर्यंत शेतकऱ्यांनी आपले पीक कसेबसे वाचविले मात्र समस्या बिकट झाल्याने बावनथडी प्रकल्पाचे पाणी नदी पात्रात सोडवण्याकरिता लेखी पत्र दिले परंतु अद्याप पाणी सोडले गेले नाही परिणामी शेतकरी हवालदिल झाले आहे.
- ठाकचंद मुंगूसमारे, तालुका अध्यक्ष रायुका