सक्करधरात ऐन पावसाळ्यात भीषण पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:24 AM2021-06-28T04:24:15+5:302021-06-28T04:24:15+5:30
चुल्हाड (सिहोरा) : सातपुडा पर्वतरांगांच्या घनदाट जंगलाशेजारी असणाऱ्या आदिवासी सक्करधरा गावात सौरऊर्जेवरील आधारित दुहेरी पंप नळ पाणीपुरवठा योजनेत तांत्रिक ...
चुल्हाड (सिहोरा) : सातपुडा पर्वतरांगांच्या घनदाट जंगलाशेजारी असणाऱ्या आदिवासी सक्करधरा गावात सौरऊर्जेवरील आधारित दुहेरी पंप नळ पाणीपुरवठा योजनेत तांत्रिक बिघाड आल्याने गावकऱ्यांवर ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. गावात पाण्याचे अन्य स्रोत नसल्याने नदीतील गढूळ पाण्याचा उपयोग गावकरी करीत आहेत. ग्रामपंचायतीच्या प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
गट ग्रामपंचायत असणाऱ्या सक्करधरा गावातील आदिवासी बांधवांचे जिणे उपेक्षित आहे. बावणथडी नदीच्या काठावरील १५० ते २०० लोकवस्तीचे सक्करधरा गाव. गावात तसाही रोजगाराचा अभाव आहे. गट ग्रामपंचायत अंतर्गत गावांच्या विकासकार्याचा अजेंडा १६ किलोमीटर अंतरावरून राबविला जात आहे. धुटेरा गावातून विकासकार्य केले जात आहे. या गावाला एक ग्रामपंचायत सदस्य पद मिळाले आहे. शंभर टक्के आदिवासी असणाऱ्या या गावात नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योजना राबविण्यात आलेल्या नाहीत. गावात रोजगार नसल्याने मोहफूल दारूविक्री घराघरांत करायची. नंतर मुले शिक्षित झाल्याने या व्यवसायापासून गावकरी दुरावले आहेत. गावात रोजगार नसल्याने दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीवर मजूर म्हणून कामे करीत आहेत. या गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘लोकमत’ने सातत्याने संघर्ष निर्माण केला आहे. यानंतर गावात नाले, सिमेंट रस्ते पोहोचले आहेत. घरकुले पोहोचली आहेत. रापणी बस पोहोचली आहे. गाव चकाचक झाला आहे. परंतु यंत्रणेने रोजगार पोहोचविले नाही, अशी खंत गावकऱ्यांत आहे.
गावात चार बोअरवेल्स तयार करण्यात आल्या आहेत. त्या चारही बंद झाल्या आहेत. नदीच्या काठावर गाव असतानाही बोअरवेल्स यशस्वी झाल्या नाहीत. यानंतर गावातील पाणी समस्या सोडविण्यासाठी सौरऊर्जेवरील आधारित दुहेरी पंप नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. माजी सदस्य संजय सरोते यांच्या घराशेजारी नळ योजना मंजूर करण्यात आली आहे. गत अनेक दिवसांपासून ती बंद आहे. यामुळे ऐन पावसाळ्यात गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावात अन्य स्रोत नाहीत. दीड किलोमीटर अंतरावरील नदीपात्रातून पाणी आणावे लागत आहे. गढूळ पाणी नदीपात्रात असताना नाइलाज आहे. दूषित पाण्यामुळे गावकरी आजाराने भयभीत आहेत. गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी यंत्रणा धावत येत नाही. यामुळे गावात समस्या जैसे थे आहेत.
बॉक्स
वन विभागावर आदिवासींचा रोष
संरक्षित जंगलाशेजारी आदिवासी बांधवांचे वास्तव्य आहे. जंगलात रोपे लागवड, खड्डे खोदकाम, नालीचे खोदकाम, खुंट कटाईची कामे केली जात आहेत. परंतु वन विभागाची यंत्रणा गावकऱ्यांना रोजगार देण्याचे प्रयत्न करीत नाही. वर्षभर कामे देण्याची क्षमता वन विभागाकडे आहे; परंतु आदिवासी बांधवांना ठेंगा दाखविला जात आहे. खावटी वाटपात भेदभाव केला जात आहे. आदिवासी बांधवांना न्याय देण्याचे प्रयत्न होत नाहीत. मोठ्या बाता हाकल्या जातात. यामुळे गावातील आदिवासी उपेक्षित आहेत. गावात कधी यंत्रणा येत नाही. ग्रामसेवक योजनेचा पिटारा घेऊन येत नाही. निम्म्याहून अनेक लोकांना सरपंच, सचिव माहीत नाहीत. गावात चावडी वाचन कधी झाले नाही. धुटेरा, हमेशा, मल्लालटोला, घानोड, सक्करधरा अशी गावे जोडण्यात आली असल्याने एक ना धड भाराभर चिंध्या असे चित्र गावात आहे.
कोट
गावात सौरऊर्जेवरील नळयोजना गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. निवेदन व तक्रारी केल्या आहेत. गावकरी नदीतील गढूळ पाण्याचा उपयोग करीत असल्याने आदिवासी बांधवांना न्याय देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातले पाहिजे.
संजय सरोदे, माजी सदस्य, ग्रामपंचायत धुटेरा