धानपीक किडींच्या सावटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 05:00 AM2020-04-09T05:00:00+5:302020-04-09T05:00:40+5:30
लाखनी तालुक्याच्या चुलबंद नदीखोऱ्यात उन्हाळी धानासह भाजीपाल्याची मोठी शेती केली जाते. खरीपात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी पिकांची लागवड केली. लाखनी तालुक्यात १९७२ हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली असून त्यात पालांदूर कृषी मंडळात ९८२ हेक्टर धानाचा समावेश आहे. तसेच भेंडी, कारले, टमाटर, वांगे आदी मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली.
मुखरु बागडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर (चौ.) : सर्वत्र कोरोनाचे संकट घोंगावत असताना आता शेतशिवारातील धानपिकासह भाजीपाल्यावर किडींनी आक्रमण केले आहे. प्रत्येक शेतात करपा, खोडकिडींचा प्रादूर्भाव वाढला असून नियंत्रणासाठी मजूरही मिळतही नाही. बदलत्या वातावरणाचा हा फटका असून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होत आहे.
लाखनी तालुक्याच्या चुलबंद नदीखोऱ्यात उन्हाळी धानासह भाजीपाल्याची मोठी शेती केली जाते. खरीपात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी पिकांची लागवड केली. लाखनी तालुक्यात १९७२ हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली असून त्यात पालांदूर कृषी मंडळात ९८२ हेक्टर धानाचा समावेश आहे. तसेच भेंडी, कारले, टमाटर, वांगे आदी मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. दिवाळीपासून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. पाऊस आणि गारपीटीने भाजीपाला पीक उद्ध्वस्त झाले आहे. विषम वातावरणामुळे धानावर करपा आणि खोडकिडीचा प्रादूर्भाव दिसत आहे. तर भाजीपाला पिकांवर विविध किडींनी आक्रमण केले आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करताना शेतकरी धास्तावले असताना आता किडींचा बंदोबस्त कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या धानाचे पीक अंतिम टप्प्यात असून काही गर्भावस्थेत तर काही निसव्यावर आहेत. आता ढगाळी वातावरणाने या किडींचा प्रादूर्भावात वाढ होत आहे.
खोडकिडी, करपा, पर्णकोष करपा, मानमोडी आदी रोगांचा प्रादूर्भाव शेतात दिसून येत आहे. लोंब्या पांढऱ्या पडत आहे. प्रत्यक्ष बांधीमध्ये उतरून पाहणी करावी. त्यासाठी योग्य उपाययोजना केल्यास उत्पादनात होणारी घट टाळता येऊ शकते.
-पद्माकर गिदमारे, तालुका कृषी अधिकारी, लाखनी.