तथागतांच्या जीवनावरील प्रसंग देतात शांती आणि अहिंसेचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:39 AM2019-05-18T00:39:56+5:302019-05-18T00:40:26+5:30
पत्र्त्रामेत्ता संघद्वारा निर्मित रूयाळ (सिंदपुरी) येथील महासमाधीभूमी महास्तूप परिसरात साकारण्यात आलेले तथागत गौतम बुद्धाच्या जीवनावरील प्रसंग शांती, अहिंसा, समता आणि बंधुत्वाचा संदेश देतात. वर्षभर याठिकाणी पर्यटकांसोबतच उपासक-उपासिका भेट देत असतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : पत्र्त्रामेत्ता संघद्वारा निर्मित रूयाळ (सिंदपुरी) येथील महासमाधीभूमी महास्तूप परिसरात साकारण्यात आलेले तथागत गौतम बुद्धाच्या जीवनावरील प्रसंग शांती, अहिंसा, समता आणि बंधुत्वाचा संदेश देतात. वर्षभर याठिकाणी पर्यटकांसोबतच उपासक-उपासिका भेट देत असतात.
भंडारा जिल्ह्याला जगाचा नकाशावर नेवून ठेवणारे हे ठिकाण भारत आणि जपानच्या मैत्रिचे प्रतीक ठरले आहे. भदंत संघरत्न माणके यांच्या प्रयत्नातून महास्तूप साकारला आहे. तथागत गौतम बुद्धाच्या जीवनावरील विविध प्रसंग येथे साकारले आहेत. पहिल्या प्रसंगात रस्त्याने जात असलेली प्रेत यात्रा, दु:खी म्हातारा पाहून भाऊक झालेले घोड्यावरील राजकुमार सिद्धार्थ पाहणाऱ्या भावविभोर करतात. नंतरच्या प्रसंगात ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर भुकेने व्याकूळ झालेल्या तथागतांना द्यानपात्रात खीर देत असलेली सुजाता दिसते. हा प्रसंग हुबेहुब वाटतो. नंतरच्या प्रसंगात सारनाथ येथील पाच शिष्यांना तथागत उपदेश करीत असल्याचे साकारण्यात आले आहेत. शेवटच्या प्रसंगात तथागताचे महापरिनिर्वाण दर्शविण्यात आल्या आहेत. तथागतांच्या जीवनावरील प्रसंग पाहून येथे येणारा प्रत्येकजण धन्य झाल्याशिवाय राहत नाही.