शास्त्री विद्यालयाची ‘ओजल’ जिल्ह्यात अव्वल
By admin | Published: May 31, 2017 12:34 AM2017-05-31T00:34:32+5:302017-05-31T00:34:32+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दुपारी १ वाजता आॅनलाईनद्वारे बारावीचा निकाल घोषित यात भंडारा जिल्ह्याचा निकाल ९२.९३ इतका लागला.
जिल्ह्याचा निकाल ९२.९३ टक्के : नागपूर विभागात भंडारा प्रथम क्रमांकावर
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दुपारी १ वाजता आॅनलाईनद्वारे बारावीचा निकाल घोषित यात भंडारा जिल्ह्याचा निकाल ९२.९३ इतका लागला. भंडारा येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयाची ओजल धमेंद्र उरकुडकर या विद्यार्थिनीने ९४ टक्के गुण प्राप्त करून जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला. तिला ६५० पैकी ६११ गुण मिळाले आहेत.
द्वितीय क्रमांक शहापूर येथील नानाजी जोशी महाविद्यालयाची विद्यार्थिनी भाग्यश्री वाहीले (५९७ गुण) हिने तर तृतीय क्रमांक भंडारा येथील नुतन कन्या शाळेची ऋतिका सुखराम वाघमारे प्राप्त केला. यावर्षीही मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली आहे. कला शाखेतून नानाजी जोशी विद्यालयाची प्रांजली भालाधरे ही विद्यार्थिनी जिल्ह्यातून पहिली आली असून तिला ८७.२३ टक्के गुण मिळाले आहेत. बारावीची १९ हजार ३९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १८ हजार २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
श्रेणीनिहाय निकाल
यावर्षी जिल्ह्यातून १९ हजार ४०६ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी १९ हजार ३९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी १८ हजार २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ६०५ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी प्राप्त केली. ५,७८० विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ११ हजार ४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ६३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
शाखानिहाय निकाल
जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ९७.६० टक्के, कला शाखेचा निकाल ८९.२१ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९६.०४ टक्के तर एमसीव्हीसी शाखेचा निकाल ९१.४३ टक्के लागला आहे. शाखानिहाय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेचे ७,३९५ विद्यार्थी, कला शाखेचे ९,०५८, वाणिज्य शाखेचे १,०१९ तर एमसीव्हीसी शाखेचे ५५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
साकोली तालुका अव्वल
भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यातून साकोली तालुका विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीत आघाडीवर आहे. मोहाडी तालुक्याचा निकाल पिछाडीवर आहे. तालुकानिहात निकालांतर्गत भंडारा तालुक्याची निकालाची टक्केवारी ९४.२३, लाखांदूर ९३.६०, लाखनी ९३.१६, मोहाडी ९०.५२, पवनी ९०.८०, साकोली ९४.७७ तर तुमसर तालुक्याची निकालाची टक्केवारी ९२.६० इतकी आहे. सातही तालुक्यातून मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९१.०७ असून मुलींची टक्केवारी ९४.६६ आहे.
तालुकानिहाय उत्तीर्ण विद्यार्थी
१८ हजार २७ उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये भंडारा तालुक्यातून ४,८१७ पैकी ४,५३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लाखांदूर तालुक्यातून १,४६९ पैकी १,३७५ विद्यार्थी, लाखनी तालुक्यातून २,५६० पैकी २,३८५ विद्यार्थी, मोहाडी तालुक्यातून २,६८०पैकी २,४२६ विद्यार्थी, पवनी तालुक्यातून २,२८३ पैकी २,०७३ विद्यार्थी, साकोली तालुक्यातून २,४२६ पैकी २,२९९ विद्यार्थी तर तुमसर तालुक्यातून ३,१६४ पैकी २,९३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.