‘त्या’ वृद्धासाठी मासेमार बांधव ठरले ‘देवदूत’

By admin | Published: July 6, 2017 12:31 AM2017-07-06T00:31:32+5:302017-07-06T00:31:32+5:30

‘देव तारी त्याला कोण मारी’ ही म्हण वैनगंगा नदीच्या छोट्या पुलावरून नदीपात्रात पडलेल्या इसमाबाबत घडली.

'She' as a Fleet for a Woman 'Angel' | ‘त्या’ वृद्धासाठी मासेमार बांधव ठरले ‘देवदूत’

‘त्या’ वृद्धासाठी मासेमार बांधव ठरले ‘देवदूत’

Next

कारधा नदी पात्रातील प्रकरण : भंडारा शहर पोलिसांनी फिरविली घटनास्थळाकडे पाठ
प्रशांत देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ‘देव तारी त्याला कोण मारी’ ही म्हण वैनगंगा नदीच्या छोट्या पुलावरून नदीपात्रात पडलेल्या इसमाबाबत घडली. या वृद्धाला नदीपात्रात मासेमारी करणाऱ्या बांधवांनी वाचविल्याची घटना मंगळवारला घडली.
अडकोबा गाढवे (७५) रा.कोलारी असे त्या वृद्धाचे नाव आहे. सदर गृहस्थ हा कारधा नदीच्या लहान पुलावरून पायदळ जात होता. अचानक कुणाला कळायच्या आत ते नदीपात्रात पडले. कुणी म्हणतात, त्यांनी उडी घेतली तर कुणी म्हणतात, भोवळ आल्याने ते पडले. मात्र समयसूचकता दाखवून मासेमारी करणाऱ्या दोन इसमांनी त्यांचे प्राण वाचविले.
आसाराम शेंडे व उमेश शेंडे असे या वृद्धाचे प्राण वाचविणाऱ्या या मासेमाऱ्यांचे नाव आहे. हे दोघेही कारधा येथील रहिवासी आहेत. नेहमीप्रमाणे आसाराम व उमेश हे मंगळवारला दुपारच्या सुमारास छोट्याशा डोंगीतून वैनगंगा नदीच्या पात्रात मासेमारी करीत होते. यावेळी लहान पुलावरून जोरजोराने ओरडण्याचा आवाज त्यांनी ऐकला. पुलाच्या दुसऱ्या बाजूला असल्यामुळे त्यांना काहीही दिसले नाही. त्यामुळे वृद्ध पडलेल्या बाजूने त्यांनी डोंगी टाकली. यावेळी पाण्याचा प्रवाह असल्याने त्यात एक वृद्ध वाहून जाताना त्यांना दिसला. या दोघांनीही जीवाची पर्वा न करता वृद्धाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यात ते यशस्वीही झाले. त्यांनी वृद्धाला पाण्यातून बाहेर काढले. दरम्यान पुलावर बघ्यांची गर्दी झाली होती. यातीलच कुणीतरी कारधा पोलिसांना माहिती दिल्याने पोलिसही घटनास्थळी पोहचले होते.
पोलिसांना वृद्धाच्या खिशात रूग्णालयाची चिठ्ठी, ५० रूपये व निवडणूक ओळखपत्र मिळाले. यावरून अडकोबा गाढवे यांची ओळख पटली. या नदीपात्रात मासेमार बांधवांनी आतापर्यंत अनेकांना जीवनदान दिले आहे. अनेकांचे मृतदेह काढून त्यांच्या कुटुंबियांच्या सुपूर्दही केले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे पोलीस प्रशासनाची होणारी धावपळ थांबली. दरम्यान याबाबत कारधा पोलिसांना विचारले असता, आडकोबा यांना पोटाचा त्रास असल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.
भंडारा पोलिसांचे दुर्लक्ष
घटनास्थळ भंडारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. त्यामुळे घटनास्थळावर पोहचलेल्या कारधा पोलिसांनी याची माहिती भंडारा पोलिसांना वारंवार दिली. या प्रकरणाचे गांभीर्य असतानाही भंडारा शहर ठाण्यातून कुठलेही पोलीस कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली नाही. याबाबत कारधा पोलिसांनी वरिष्ठांकडे तक्रार केल्याचीही माहिती समोर आली आहे.

धोतरामुळे वाचला ‘अडकोबा’चा जीव
अडकोबा यांनी अंगात धोतर घातला होता. नदीपात्रात ते पडल्यानंतर हवेच्या दाबाने अंगातील धोतर फुलला. त्यामुळे ते नदीपात्रात खोलवर न जाता धोतरामधील हवेच्या दाबामुळे ते पाण्यावर तरंगत राहिले. कदाचित त्यांनी पँट परिधान केलेला असता तर ते लागलीच तळाला गेले असते. आडकोबा यांचा जीव वाचण्यात धोतर महत्त्वपूर्ण ठरला आहे.

Web Title: 'She' as a Fleet for a Woman 'Angel'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.