‘तिने’च हाणून पाडला स्वत:चा लाखो रुपयांत होणारा सौदा; दोन महिलांसह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2023 08:08 PM2023-06-24T20:08:13+5:302023-06-24T20:08:41+5:30

Bhandara News निराधार महिला हेरून तिला झाशी किंवा जळगाव येथील मंडळीकडून मोठी रक्कम घेऊन विकणाऱ्या टोळीच्या तीन हस्तकांना भंडारा जिल्ह्यातील मोहाडी पोलिसांनी अटक केली आहे.

'She' foiled her own deal worth millions of rupees; Three arrested including two women | ‘तिने’च हाणून पाडला स्वत:चा लाखो रुपयांत होणारा सौदा; दोन महिलांसह तिघांना अटक

‘तिने’च हाणून पाडला स्वत:चा लाखो रुपयांत होणारा सौदा; दोन महिलांसह तिघांना अटक

googlenewsNext

सिराज शेख

भंडारा : निराधार महिला हेरून तिला झाशी किंवा जळगाव येथील मंडळीकडून मोठी रक्कम घेऊन विकणाऱ्या टोळीच्या तीन हस्तकांना भंडारा जिल्ह्यातील मोहाडी पोलिसांनी अटक केली आहे. पतीसोबतच्या भांडणानंतर घर सोडलेल्या एका विवाहितेला त्रयस्थांनी आसरा दिला. मात्र त्यांच्याकडूनच स्वत:चा लाखो रुपयांचा सौदा होणार असल्याचे लक्षात येताच त्या महिलेने मोठ्या शिताफीने त्यांचा हा डाव हाणून पाडला. या प्रकरणात पोलिसांनी दोन महिला आणि एकाला अटक केली असून, पोलिस या तस्करीच्या साखळीतील अन्य दुवे शोधत आहेत.

मोहाडी येथील एका महिलेचे पतीसोबत भांडण झाल्याने ती ९ जून रोजी घरून निघून गेली. तिची भेट मूळची मोहाडी व सध्या जवळच पारडी येथे राहणाऱ्या ममता राहुलकर (४४) हिच्यासोबत झाली. ममताने विवाहितेची आपबीती ऐकून तिला दोन दिवस आपल्या घरी ठेवले. नंतर हरी शेंडे (५५, पारडी) याच्या स्वाधीन केले. हरी याने तिला फूस लावून ललिता दामले (४०, खैरबोडी, ता. तिरोडा, जि. गोंदिया) हिच्या घरी नेऊन सोडले. १२ जून ते १९ जूनपर्यंत आठ दिवस ही विवाहिता तेथेच होती. या काळात ललिताच्या घरी आलेली अनोळखी व्यक्ती लाखो रुपयात आपला सौदा करीत असल्याचे विवाहितेच्या लक्षात आले. यामुळे तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु तिला नेहमी आपल्या नजरेसमोर ठेवले जायचे. रात्री पळून जाऊ नये म्हणून गुंगीचे औषध दिले जात होते. या दरम्यान तिचे बनावट आधार कार्डसुद्धा तयार करण्यात आले.

असा झाला पर्दाफाश

१९ जूनच्या रात्री सुमारे ११ वाजता विवाहितेने ललिताच्या मोबाइलवरून आपल्या पतीला कॉल लावून खोकलून इशारा दिला. पतीने खोकण्याचा आवाज ओळखून पोलिसांना लगेच माहिती दिली. पोलिसांनी लोकेशन ट्रेस करून रात्रीच ललिताला ताब्यात घेऊन मोहाडीत आणले. या प्रकरणात ममता राहुलकर, ललिता दामले व हरी शेंडे यांना अपहरण, मानव तस्करी, खोटे आधार कार्ड बनविणे, शिवीगाळ, धमकी या आरोपात कलम ३६५, ३६६, ३७०, ५११, ४६८, ५०४, ५०६, ३४ भादंविनुसार अटक केली. २६ जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक लोहित मतानी, उपविभागीय अधिकारी अशोक बागुल यांच्या मार्गदर्शनात, पोलिस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार, पोहवा पिंटू लांडगे हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: 'She' foiled her own deal worth millions of rupees; Three arrested including two women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.