‘ती’ कोरोना काळात भरकटली; तीन वर्षानंतर पोहोचली कुटुंबात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 10:42 AM2023-06-17T10:42:01+5:302023-06-17T10:44:09+5:30
पश्चिम बंगालहून मोहाडीत पोहोचलेल्या ‘तिला’ ‘सखी वन स्टॉप’ने घडविली कुटुंबीयांची भेट
गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : ते कोरोना संक्रमणाचे दिवस! ‘ती’ असहाय... अन् निराधार..! ना भाषेची जाण, ना जवळ पैसा..! पोटात भूक घेऊन रात्री भटकणाऱ्या तिला पोलिसांनी देव्हाडीच्या (ता. मोहाडी) स्वाधारगृहात आसरा दिला. दोन वर्षांनंतर तिला भान आले. गावाची आठवण सतावू लागली. अखेर पोलिसांनी पश्चिम बंगालमधील तिचे गाव शोधले. तब्बल तीन वर्षांनंतर कुटुंबीयांशी भेट घडली आणि भरकटलेली ‘ती’ कुटुंबात पोहोचली.
चित्रपटात शोभावी अशी ही कहाणी! आशाकुमारी (काल्पनिक नाव) मूळची पश्चिम बंगालमधील मिधेनपूर जिल्ह्यातील शुगनीवासा या गावची. मे-२०२० मध्ये तिचा घरी वाद झाला. रागाने ती बाहेर पडली. सर्वत्र कोरोनाचे लॉकडाऊन; मनस्थिती बिघडलेली. अशातच या गावातून त्या गावात, या ट्रकमधून त्या ट्रकमध्ये बसून ती पोहोचली भंडारा जिल्ह्यातील मोहाडीत. लॉकडाऊनमध्ये गस्तीदरम्यान १९ जून २०२० च्या रात्री विमनस्कपणे भटकणारी आशाकुमारी मोहाडी पोलिसांना दिसली. लॉकडाऊनमुळे तिच्या कुटुंबाचा शोध घेऊन पोहोचविणे शक्य नसल्याने पोलिसांनी तिला देव्हाडी (ता. मोहाडी) येथील महिला स्वाधारगृहात दाखल केले. दोन वर्षांनी ती भानावर आली. कुटुंबाची आठवण करू लागली. तेथील समुपदेशिका सविता मदनकर यांनी तिच्या कुटुंबीयांचा शोध घेणे सुरू केले. मात्र, पदरी निराशाच पडली.
अखेर भंडारातील ‘सखी वन स्टाॅप सेंटर’च्या प्रशासक लता भुरे यांची मदत मागितली. त्यांनी दुभाषाच्या माध्यमातून बंगाली भाषेतून संवाद साधून कसेबसे तिच्या गावाचे नाव मिळविले. गुगलवरून ते गाव शोधले. नंतर मोहाडी पोलिसांच्या मदतीने पश्चिम बंगालमधील झारग्रामचे ठाणेदार सौरभ चक्रवर्ती यांच्याशी संपर्क साधून कुटुंबीयांचा शोध घेतला.
घरात घेण्यास नकार
आदिवासी समाजातील असलेल्या आशाकुमारीच्या समाजात एकदा घराबाहेर पडलेल्या महिलेला पुन्हा घरात घेतले जात नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला घरात घेण्यास नकार दिला. पोलिसांनी तिच्या निष्कलंकपणाची खात्री दिली, तेव्हा कुठे स्वीकारण्यास होकार मिळाला. त्यानंतर भंडाऱ्याहून पोलिस पथकासह लता भुरे आणि सविता मदनकर यांनी अलीकडेच शुगनीवासा या तिच्या गावी जाऊन तिला कुटुंबाकडे सोपविले.
१० दिवसांपूर्वीच पतीचा मृत्यू
ती कुटुंबात पोहोचली. मात्र, पतीची भेट तिच्या नशिबात नव्हती. १० दिवसांपूर्वीच तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. एका डोळ्यात कुटुंबाला भेटल्याचे आनंदाश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात पतीच्या मृत्यूचे दु:खाश्रू तिच्या वाट्याला आले.