सात पंचायत समित्यांचे शिलेदार आज ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2022 05:00 AM2022-05-06T05:00:00+5:302022-05-06T05:00:47+5:30

पंचायत समितीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत असल्याने सभापती आणि उपसभापती काँग्रेसचाच होईल हे स्पष्ट आहे. पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचे नऊ तर तीन अपक्ष सदस्य निवडून आले होते. सभापतीपदी होमराज कापगते यांची निवड होण्याची शक्यता असून उपसभापती म्हणून महिला सदस्यांची निवड होण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीला काँग्रेसच्या नऊ सदस्यांपैकी सात सदस्य देव दर्शनासाठी गेले असून शुक्रवारी सकाळी ते पोहचणार आहेत.

Shiledar of seven Panchayat Samitis will be held today | सात पंचायत समित्यांचे शिलेदार आज ठरणार

सात पंचायत समित्यांचे शिलेदार आज ठरणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : निवडणूक निकालाच्या तब्बल साडेतीन महिन्यानंतर शुक्रवारी सात पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीची निवडणूक होत आहे. कुठे सभापती पदासाठी तर कुठे उपसभापती पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांचे शिलेदार ठरणार असल्याने उत्सुकता आहे.
साकोली आणि तुमसर येथील सभापतीपद सर्वसाधारण असून लाखनी, भंडारा आणि पवनी येथे सर्वसाधारण महिला तर मोहाडी अनुसूचित जाती आणि लाखांदूरमध्ये अनुसूचित जमातीसाठी सभापतीपद राखीव आहे. बहतांश ठिकाणी सभापती पदांचे नाव जवळ जवळ निश्चित झाले असून ऐनवेळी काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  
लाखांदूरमध्ये उपसभापतिपदासाठी काँग्रेस-भाजपचे राष्ट्रवादीला साकडे
लाखांदूर पंचायत समितीच्या सभापतिपदी अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवडून आलेल्या एकमेव उमेदवार राष्ट्रवादीच्या संजना संजय वरकडे यांची निवड होणार असल्याचे आरक्षण सोडतीनंतरच निश्चित झाले होते. केवळ सोपस्कर तेवढे बाकी आहे.
पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस व भाजपचे प्रत्येकी पाच उमेदवार निवडून आले. तर राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांनी विजय मिळविला होता. उपसभापतिसाठी सात सदस्यांचे बहुमत असणे आवश्यक आहे. काँग्रेस व भाजपचे प्रत्येकी पाच उमेदवार असल्याने दोन्ही पक्ष आता उपसभापतिपदासाठी राष्ट्रवादीला साकडे घालत आहेत. 

भंडारामध्ये राष्ट्रवादीला संधी

- भंडारा पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून येथे राष्ट्रवादीला संधी मिळणार आहे. पंचायत समितीत राष्ट्रवादी सहा, भाजप सात, काँग्रेस चार, अपक्ष दोन आणि शिवसेना एक असे संख्याबळ आहेत. दाेन अपक्ष राष्ट्रवादीच्या सोबत असल्याचा दावा करण्यात आला आहे.  बेला गणातून निवडून आलेल्या रत्नमाला चेटूले यांच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडण्याची शक्यता आहे. 

तुमसरमध्ये निवडणूक होणार अटीतटीची

-  तुमसर :  पंचायत समितीत भाजप आणि महाविकास आघाडीकडे प्रत्येकी दहा सदस्य असून बहुमतासाठी एका सदस्याची गरज आहे. त्यामुळे सभापती व उपसभापतिपदासाठी जोरदार रस्सीखेच होत आहे. समान मते पडल्यास ईश्वर चिठ्ठीने सभापती व उपसभापती निवडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपकडून नंदू रहांगडाले, लक्ष्मीकांत सेलोकर व  पल्लवी कटरे यांच्या नावाची चर्चा आहे. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे मनोज झुरमूरे व काँग्रेसचे हिरालाल नागपुरे यांची नावे सध्या चर्चेत आहेत. येथे शिवसेनेच्या दीपिका गौपाले यांचेही नावही आघाडीवर आहे. 

साकोलीत काँग्रेसचेच सभापती-उपसभापती

- साकोली : पंचायत समितीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत असल्याने सभापती आणि उपसभापती काँग्रेसचाच होईल हे स्पष्ट आहे. पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचे नऊ तर तीन अपक्ष सदस्य निवडून आले होते. सभापतीपदी होमराज कापगते यांची निवड होण्याची शक्यता असून उपसभापती म्हणून महिला सदस्यांची निवड होण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीला काँग्रेसच्या नऊ सदस्यांपैकी सात सदस्य देव दर्शनासाठी गेले असून शुक्रवारी सकाळी ते पोहचणार आहेत. उपसभापतीपदी कुणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागले आहे.

पवनीत सभापतीपदी नूतन कुर्झेकर यांची वर्णी

- पवनी : पंचायत समितीत सर्वाधिक सदस्य काँग्रेसचे असल्याने सभापतीपद काँग्रेसलाच मिळेल असे गणित मांडले जात होते. मात्र राष्ट्रवादीने डाव खेळत शिवसेना, भाजप व बसप सदस्यांना एकत्र केले आणि देवदर्शनासाठी पाठविले. सभापतीपदी राष्ट्रवादीच्या नूतन कुर्झेकर तर उपसभापतीपदी शिवसेनेचे श्रीराम बागडे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. येथे काँग्रेस सहा, राष्ट्रवादी तीन, शिवसेना तीन आणि भाजप व बसपचा प्रत्येकी एक सदस्य आहे. सर्वात मोठा पक्ष काँग्रेसला विरोधी बाकावर बसण्याची वेळ येणार आहे.

 

Web Title: Shiledar of seven Panchayat Samitis will be held today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.