साईभक्त पायी निघाला शिर्डीला
By Admin | Published: September 13, 2015 12:30 AM2015-09-13T00:30:03+5:302015-09-13T00:30:03+5:30
‘तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, हे जगदाता साईबाबा, मी शिर्डीला पायी चालत येईन’, ...
तिसऱ्यांदा निघाला वारीवर : विजयादशमीला शिर्डीला पोहोचणार
भंडारा : ‘तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, हे जगदाता साईबाबा, मी शिर्डीला पायी चालत येईन’, या भजनातील वाक्याप्रमाणे आणि साईबाबांवर निस्सिम भक्ती असलेल्या ओडिसा राज्यातील एका भक्ताने ओडिशा ते शिर्डी असा पायदळ प्रवास सुरू केला आहे.
बिपत तारण दास (४५) रा. बोलोनी, जि.केवझर, ओडिशा असे या साईभक्ताचे नाव आहे. ओडिसावरून दोन हजार किमी लांब असलेल्या शिर्डीला जाण्यासाठी बिपत दास हा अनवानी पायाने निघाला आहे. १६ आॅगस्ट रोजी सुरू झालेला त्याचा पायी प्रवास अडीच महिन्यानंतर म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी शिर्डी येथे संपणार आहे. याच प्रवासादरम्यान, काल बिपत दास यांचे भंडारा शहरात आगमन झाले. त्यांचा मुक्काम तुकडोजी पुतळ्याजवळील हनुमान मंदिरात होता. डोक्यावर साईबाबांची पालखी घेऊन आलेल्या बिपतशी चर्चा केली असता साईभक्तीमागील पार्श्वभूमी सांगितली.
आपण सधन कुटुंबातील असून मला जेव्हा साईबाबांचा साक्षात्कार होतो, तेव्हा मी अनवानी पायाने शिर्डीच्या प्रवासाला निघतो. सधन कुटुंबातील असल्याने वाहतुकीची अनेक साधने आहेत. तरीसुद्धा एकाही वाहनाचा उपयोग करीत नाही. यापुर्वी शिर्डीला दोनदा पायी गेलेलो असून ही तिसरी वेळ असल्याचे त्यांनी सांगितले. ओडिसा ते शिर्डी या पायी प्रवासात तब्बल अडीच महिन्याचा कालावधी लागतो. दररोज ४० कि.मी. पायी प्रवासानंतर एखाद्या मंदिरात मुक्काम करणे. सकाळी पुन्हा पुढच्या प्रवासाला निघणे असा दिनक्रम आहे. एका लहान बॅगेत कपडे व अन्य सामान आहेत. मुक्कामी असताना कुणाचीही मदत न घेत स्वत:ची व्यवस्था स्वत:च करीत असल्याचे सांगितले.
दि. ११ सप्टेंबर रोजी त्यांनी भंडाऱ्याहून शिर्डीसाठी प्रस्थान केले. प्रवासादरम्यान ठिकठिकाणी मुक्काम करीत दसऱ्याच्या दिवशी ते शिर्डीत पोहोचतील. साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर पुन्हा त्याच पद्धतीने डोक्यावर साईबाबांची पालखी घेऊन तो बोलोनी या मूळ गावाकडे रवाना होईल. परतताना गावोगावात साईबाबांचा प्रसाद वाटत जाणार असून हा प्रवाससुद्धा अडीच महिन्याचा असेल. सन २०१० मध्ये त्यांनी बोलोनी ते शिर्डी हा प्रवास असा रात्रंदिवस केला होता. त्यावेळी शिर्डी येथे पोहोचण्यासाठी एक महिना १६ दिवसांचा कालावधी लागल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)